
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर शहरासह राज्याच्या वेगवेगळ्या शहरांतून दुचाकींची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य चोरट्यास पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडून एकूण १० लाख ९८ हजारांच्या ३५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जेलरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली आहे. शंकर भारत देवकुळे (रा. वैराग रोड, ता. धाराशिव, जि. धाराशिव) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे.३१ ऑक्टोबर रोजी पोलिस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, उमेश सावंत यांना एकजण दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली. त्यावरुन सीसीटीव्हीची पडताळणी केल्यावर तो दुचाकी विक्रीसाठी शनिवार पेठेतील हेवन टॉवरजवळ आल्याची खात्री झाली. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संदी पाटील यांच्या पथकाने तेथे शंकर देवकुळे यास पकडले.शंकर याच्याकडून पोलिसांनी जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली एम एच १३ डी एल ५८५६ या क्रमांकाची दुचाकी जप्त केली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने शहरातील सदर बझार सहा, फौजदार चावडी तीन व जेलरोडच्या हद्दीतून दोन असे ११ तर पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, सांगली शहरातून २४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या जप्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड