
जगातील नागरीकरणाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. शहरांचा व्यापारी, औद्योगिक, शैक्षणिक आणि रोजगाराच्या संधींमुळे विस्तार होत असताना लोकसंख्येचे स्थलांतर, वस्त्यांची वाढ, दैनंदिन व्यवहारांमध्ये गुंफणारे आयुष्य आणि ताणतणावांनी भरलेला आधुनिक काळ यामधून होणारा प्रवास हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या पार्श्वभूमीवर १० नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन’ केवळ वाहतुकीची सोय किंवा सुविधा यापुरता मर्यादित न राहता समाज, अर्थव्यवस्था, पर्यावरण, संस्कृती आणि विकास या सर्वांवर परिणाम करणाऱ्या वाहतूक प्रणालीच्या सामाजिक अर्थपूर्णतेकडे मानवी दृष्टीने पाहण्याची एक महत्त्वपूर्ण संधी निर्माण करतो. सार्वजनिक वाहतूक म्हणजे केवळ बस, रेल्वे, मेट्रो, ट्राम किंवा सार्वजनिक सायकल नेटवर्क एवढेच नव्हे, तर सामूहिक वापर, समान सहभाग आणि सबलीकरण यांची सामाजिक प्रक्रिया आहे. नागरिकांच्या सर्व घटकांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या केंद्रस्थानी आणणारा हा लोकशाहीवादी वाहतुकीचा मार्ग आहे.
आपल्या देशात आणि जगभरात वाढते खासगीकरण, वेगाने वाढणारी चारचाकी वा दुचाकी वाहने, रस्त्यांवरील रहदारीची कोंडी, प्रदूषणाचे प्राणघातक स्तर, संसाधनांचा अनियंत्रित वापर आणि वाढता इंधन खर्च यामुळे समाज अनेक संकटांसमोर उभा आहे. खासगी वाहनांचा वापर हा ‘सोयीचा’ वाटत असला, तरी तो समाजासाठी व पृथ्वीसाठी ‘महागडा’ ठरत आहे. खासगी वाहनाचं मालकत्व हे वैयक्तिक प्रतिष्ठा किंवा सामाजिक स्थानाचे प्रतीक मानण्याची प्रवृत्ती वाढत गेली, आणि त्यातून सामूहिकतेपेक्षा वैयक्तिकतेला’ अधिक महत्त्व देण्याची वृत्ती अधिक बळकट झाली. परंतु सामाजिक आयुष्याचे खरे स्वास्थ्य हे सर्वांसाठी उपलब्ध, परवडणारी आणि समतोल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यावर अवलंबून आहे. कारण सार्वजनिक वाहतूक ही केवळ प्रवासाची पद्धत नसून ती समाजातील असमानता कमी करण्याचे प्रभावी साधन आहे.
समाजशास्त्रीय दृष्टीने पाहिले असता वाहतूक ही सामाजिक संरचनेचा पाया आहे. शहराचे समाजशास्त्र, ग्रामीण-शहरी अंतर, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण-अभ्यास-रोजगाराच्या संधींतील समानता, आर्थिक गतिशीलता, सामाजिक परस्परसंबंध आणि पर्यावरणपूरक जीवनशैली हे सर्व वाहतूक व्यवस्थेशी खोलवर निगडित आहेत. उदा. ज्यांच्या राहण्याची व्यवस्था शहरापासून दूर किंवा उपनगरात असते, त्यांना रोजगार, शिक्षण किंवा आरोग्यसेवांपर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक ही जीवनरेखा ठरते. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सार्वजनिक वाहतूक ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे, तर महिलांसाठी ती सुरक्षिततेचे कवच आहे. ग्रामीण भागातील मजुरी करणारे लोक, शिक्षणासाठी शहरात येणारे विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, उद्योगात काम करणारे कामगार, वृद्ध, विद्यार्थी, महिला, दिव्यांग या सर्वांसाठी सार्वजनिक वाहतूक म्हणजे जीवनाला जोडणारा पूल आहे.
भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात सार्वजनिक वाहतुकीचा विस्तार आणि गुणवत्ता ही आर्थिक विकासाची किल्ली ठरते. बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर यांसारख्या शहरांत मेट्रो, बीआरटीएस, ई-बस, सब-अर्बन रेल्वे आदी प्रकल्प समाजाला पुढे नेण्याचे उदाहरण आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा जिथे चांगला असतो तिथे लोकांचा प्रवास सुखकर, प्रदूषण कमी, कामाच्या संधी वाढलेल्या आणि मानसिक ताण कमी झालेला दिसतो. परंतु याच वेळी, अनेक शहरांत सार्वजनिक वाहतुकीची अवस्था अजूनही अपुरी व विस्कळीत आहे. बसेस कमी, रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी, बसस्थानकांची दुरवस्था, सुरक्षा उपायांचा अभाव, अपंगांसाठी सुविधा नसणे, प्रवासाची अस्वस्थता यामुळे अनेक लोक सार्वजनिक वाहतुकीकडून दूर जातात. या परिस्थितीने खासगी वाहनांचा वापर वाढतो, आणि वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषण, वेळेचा अपव्यय, ताणतणाव या समस्या वाढत जातात. म्हणूनच, सार्वजनिक वाहतुकीत गुंतवणूक हा खर्च नसून समाजाची भविष्यातील गुंतवणूक आहे.
खासगी वाहनांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, जैवविविधतेचा नाश, तापमानवाढ, हवामान बदल, भूमीचे व्यापारीकरण आणि पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व हे संपूर्ण मानवजातीपुढील मोठे धोके आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांनुसार प्रदूषित हवेचे दुष्परिणाम हे श्वसनविकार, हृदयरोग, कर्करोग, स्ट्रोक यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतात. जर सार्वजनिक वाहतूक मजबूत, सुबक आणि सुलभ असेल तर लाखो लोक खासगी वाहनांचा वापर सोडण्यास तयार होतात. यामुळे पर्यावरणाचे रक्षण, सार्वजनिक आरोग्य सुधारणा आणि संसाधनांचा शाश्वत वापर साध्य होऊ शकतो.
आजच्या काळात ई-बस, सायकल-शेअरींग, कारपूलिंग, मेट्रो रेल्वे, हरित ऊर्जा आधारित वाहतूक व्यवस्था आणि स्मार्ट तिकिटिंग प्रणाली यांचा वापर वाढू लागला आहे. तंत्रज्ञान आणि वाहतूक व्यवस्थापनाचा संगम हा भविष्यातील वाहतुकीचा पाया आहे. पण तंत्रज्ञानाचा वापर हा माणसांना केंद्रस्थानी ठेवूनच झाला पाहिजे. वाहतूक हे फक्त वाहनांचे व्यवस्थापन नाही; ती लोकांच्या चालण्याची, जगण्याची आणि समाजाशी जोडले जाण्याची प्रक्रिया आहे.
महिला आणि सार्वजनिक वाहतूक हा एक महत्त्वाचा विषय आहे. सुरक्षित, स्वच्छ, प्रकाशयुक्त, सुरक्षा यंत्रणांनी युक्त, महिलांसाठी अनुकूल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही महिलांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी अत्यावश्यक आहे. अनेक वेळा असुरक्षिततेमुळे महिला शिक्षण, नोकरी किंवा सामाजिक सहभाग यांपासून दूर राहतात. म्हणूनच सुरक्षित सार्वजनिक वाहतूक ही स्त्री-पुरुष समानता घडविण्यासाठी महत्त्वाची कडी आहे.
ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक अधिकच महत्त्वपूर्ण ठरते. तिथे लोक शेती, मजुरी, बाजारपेठ, शाळा, रुग्णालये, सरकारी सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी बस, सामुदायिक वाहने किंवा स्थानिक सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात. ग्रामीण वाहतुकीची कमतरता ही ग्रामीण भागातील लोकांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे ठेवते. त्यामुळे ग्रामीण वाहतुकीचा विकास हा ग्रामीण विकासाचा मूलाधार मानला पाहिजे.
सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग केवळ प्रवासातच नाही तर सामाजिक संवाद वाढण्यातही होतो. बसमध्ये किंवा रेल्वेत प्रवास करताना विविध स्तरातील, मतांतील, संस्कृतीतील लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक एकजूट, संवाद आणि सांस्कृतिक समन्वय निर्माण होतो. खासगी वाहनांमुळे निर्माण होणारा ‘एकाकीपणा’ इथे कमी होतो. म्हणजेच सार्वजनिक वाहतूक ही लोकांना जोडणारी लोकशाहीवादी जागा आहे.
आजच्या तरुण पिढीसमोर पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि आरोग्य याबाबत चिंतेचे प्रश्न आहेत. अशावेळी सार्वजनिक वाहतूक स्वीकारणे हे सामाजिक जबाबदारीचे पाऊल मानले पाहिजे. जागतिक स्तरावर 'ग्रीन मोबिलिटी', 'कार्बन न्यूट्रल सिटी', 'सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट' यांसारख्या संकल्पना विकसित होत आहेत. त्यांचा मूळ केंद्रबिंदू सार्वजनिक वाहतुकीवर आधारित शहररचना आहे.
सारांशतः, सार्वजनिक वाहतूक ही आधुनिक समाजाच्या चौफेर प्रगतीसाठी अनिवार्य आहे. ती समानता, सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण, आर्थिक विकास, सांस्कृतिक बंध, आरोग्य व जीवनमान सुधारणा यासाठी संधी निर्माण करणारी समाजाचा कणा आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला केवळ सेवा म्हणून नव्हे, तर जनहिताचा अधिकार, लोकशाहीचा आधारस्तंभ आणि शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून मान्यता दिली पाहिजे.
आज ‘जागतिक सार्वजनिक वाहतूक दिन’ हा केवळ स्मरण आणि औपचारिकता न राहता, नागरिक, सरकार, शहररचना तज्ञ, वाहतूक अधिकारी, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, आणि जनसामान्य यांनी एकत्रितपणे सार्वजनिक वाहतुकीच्या सशक्तीकरणाची प्रतिज्ञा घ्यायला हवी. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून, ती अधिक सुरक्षित, सुलभ, स्वच्छ, परवडणारी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. कारण सार्वजनिक वाहतूक मजबूत झाली, तर समाज मजबूत होईल; समाज मजबूत झाला, तर मानवजातीचा भविष्यकाळही अधिक सुरक्षित, समतोल आणि शाश्वत होईल.
- डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक समाजशास्त्राचे अभ्यासक)
संपर्क : ९९६०१०३५८२ / bagate.rajendra5@gmail.com
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी