
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।शहर वाहतूक शाखेने गेल्या चार-पाच दिवसांपासून बेशिस्त वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर व फॅन्सी नंबरप्लेट जागीच काढण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत ५०१ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून सात लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.शहरात काही वाहनचालक बुलेटसह अन्य दुचाकींना मॉडिफाय सायलेन्सर बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णांसह नागरिकांना त्रास होत आहे. तसेच फॅन्सी नंबरप्लेटचाही वापर केला जात आहे. यासह बेशिस्त वाहतुकीविरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम उघडली आहे. सकाळी व दुपारच्या सत्रात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी विशेष पथकाकडून कारवाई केली जात आहे. एक पोलिस अधिकारी व चार अंमलदार विविध मुख्य रस्त्यांसह वेगवेगळ्या चौकांत वाहनधारकांच्या बेशिस्तीला लगाम लावत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड