
जळगाव, 10 डिसेंबर (हिं.स.) चोपडा तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा बळजबरीने बालविवाह लावण्यात आला आणि त्या अत्याचारातून ती गर्भवती होऊन तिने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अडावद पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. १५ वर्षे ११ महिन्यांची ही मुलगी प्रसूतीसाठी चोपडा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली. तेथील डॉक्टरांना मुलीचे वय पाहता ती अल्पवयीन असल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ अडावद पोलिसांना याबाबत सूचना केली. पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड झाली. आरोपी याने वर्षभरापासून मुलीवर वारंवार अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर तिचा बळजबरीने विवाह लावण्यात आला. अत्याचारातून ती गर्भवती राहिली आणि रुग्णालयात तिची प्रसूती झाली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बालविवाह तसेच तिला गर्भवती ठेवण्याप्रकरणी आरोपी तरुण , मुलीचे आई-वडील, तरोच सासू-सासरे आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी प्रमोद वाघ करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर