
१२ कातकरी वीटभट्टी मजूर व दहा लहान मुलांचा होता सहभाग इगतपुरी, 10 डिसेंबर (हिं.स.) : वाडीव-हे पोलीस स्टेशन येथे ६ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे पोशेरा (ता. मोखाडा, जि. पालघर) येथील १२ कातकरी वीटभट्टी मजूर व दहा लहान मुलांना सक्तीच्या कामातून व अत्याचारातून मुक्त करण्यात आले. दीड महिन्यापूर्वी मजूर उचल घेऊन इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील वीटभट्टीवर कामासाठी आले होते.
यापूर्वीही असे प्रकार घडले असून पोलिसांनी याबाबत सतर्क राहत कारवाईची मागणी जोर धरू लागली आहेत. वीटभट्टीमालक संदीप शिंदे यांनी कमी मजुरीवर सक्तीचे काम, हालचालींवर निर्बंध आणि दुसऱ्या शेतात काम करू न देणे, अशा प्रकारे मजुरांना बंधनात ठेवले होते. याच कालावधीत एका महिलेला शेतात टोमॅटो कामासाठी नेऊन आरोपीने एकटेपणाचा फायदा घेत शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेच्या वेळी तिच्या लहान मुलांपैकी एकाने प्रसंग पाहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. महिलेवर झालेल्या अत्याचाराची माहिती समोर आल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुरंबी येथील वीटभट्टीवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर वाडीव-हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, फॉरेन्सिक मेडिकल टीम वाडीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस कर्मचारी बोराडे व जाधव तसेच श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. संशयित आरोपी संदीप शिंदे याच्यावर वेठबिगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसपथक रवाना करण्यात आले आहे. श्रमजीवी संघटनेच्या तत्पर कारवाईमुळे पीडित महिला व सर्व मजुरांना संरक्षण मिळाले आहे. तहसीलदारांकडून मुक्तीचे दाखले देण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV