रत्नागिरी : लाडघर समुद्रकिनारी सायकल, धावणे, बैलगाडी शर्यत उत्साहात संपन्न
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : लाडघर (ता. दापोली) येथील दत्त सांस्कृतिक मंडळाने दत्तजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती लाडघर किनाऱ्यावर उत्साहात पार पडल्या. हे स्पर्धेचे ५९ वे वर्ष होते. या सायकल शर्यतीत पहि
लाडघर समुद्रकिनारी सायकल शर्यत


रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : लाडघर (ता. दापोली) येथील दत्त सांस्कृतिक मंडळाने दत्तजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती लाडघर किनाऱ्यावर उत्साहात पार पडल्या.

हे स्पर्धेचे ५९ वे वर्ष होते. या सायकल शर्यतीत पहिले तीन क्रमांक अनुक्रमे प्रशांत पालवणकर, केतन पालवणकर आणि अक्षय मंडपे यांनी पटकावले. धावणे मोठ्या गटात अथर्व बरजे, आयुष बरजे, रोशन राऊत, धावणे लहान गटात श्रेयांग मोरे, रुद्र बोरकर, वीर नरवणकर यांनी क्रमांक पटकावले. बैलगाडी शर्यतीत रुद्र सुबोध बोरकर, सचिन जाधव, प्रदीप नार्वेकर, नितेश बोरकर यांनी क्रमांक पटकावले.

लाडघर दत्त मंदिर येथे साजऱ्या होणाऱ्या दत्तजयंती उत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्त सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दीपक बोरकर, उपाध्यक्ष नीलेश मोरे आणि सचिव राजन सनकुळकर यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की १९६५ पासून या मंडळातर्फे सायकल, धावण्याच्या आणि बैलगाडी शर्यती आयोजित केल्या जात आहेत. यातील शर्यतीचे अंतर २ किमी आहे, लाडघर समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सायकल, बैलगाडी चालवणे किंवा धावणे आव्हानात्मक असते. सुक्या वाळूमध्ये सायकल, बैलगाडी रुतते किंवा जास्त वेगाने पळतही नाही. त्यामुळे दरवर्षी ही स्पर्धा अटीतटीची होते.

यावर्षी या शर्यती सुरळित पार पडाव्यात यासाठी अभिनय कर्देकर, वृषाल सुर्वे, सुभाष पेडणेकर, उदय पेडणेकर, वैभव कर्देकर, विक्रांत नरवणकर आणि लाडघर ग्रामस्थांनी बहुमोल सहकार्य केले. सर्व विजेत्यांचा बक्षीस आणि चषक देऊन सत्कार करण्यात आला.

सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा. मैदानी खेळ खेळावेत. पर्यावरण जपावे आणि आपले आरोग्य तंदुरुस्त बनवावे, असे आवाहन दत्त सांस्कृतिक मंडळाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande