रत्नागिरीत ४ जानेवारीला कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन
रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या ४ जानेवारी रोजी तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन होणार आहे. सर्व धावपटू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ही जगातील कुठल्याही भाषेसाठी समर्पित पहिली अर्धमॅरेथॉन आहे. स्पर्धेत ३०० हून अधिक शहरांमधून, १
रत्नागिरीत ४ जानेवारीला कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन


रत्नागिरी, 10 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या ४ जानेवारी रोजी तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन होणार आहे. सर्व धावपटू मराठी भाषेसाठी धावणार आहेत. ही जगातील कुठल्याही भाषेसाठी समर्पित पहिली अर्धमॅरेथॉन आहे.

स्पर्धेत ३०० हून अधिक शहरांमधून, १२ राज्यांमधुन २२०० पेक्षा अधिक धावपटू कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची २० डिसेंबर ही शेवटची तारीख आहे, अशी माहिती आज हॉटेल सी फॅन्स येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून ही अर्धमॅरेथॉन होणार आहे.मॅरेथॉनदरम्यान जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केलेला असेल. अत्यावश्यक आहे तेथेच इंग्रजी भाषा असेल, असं यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

संपूर्ण महाराष्ट्रात फिरून २५ पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील अनेक धावपटूना भेटून या उपक्रमाची माहिती दिली गेली आहे. यानिमित्ताने ३० दिवसांत जवळपास ४००० किलोमीटरचा प्रवास कोकण कोस्टल टीमने केला.

मुंबई रोड रनर्स या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक मॅरेथॉनचे लेखापरीक्षण होते आणि मॅरेथॉनला रेटिंग दिले जाते. त्यामध्ये रत्नागिरीची मॅरेथॉन पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मराठी भाषा विभाग या उपक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत. बँक ऑफ इंडिया, अॅड प्लस H२O पार्टनर, सोर्जेन सॉक्स, एनर्जाल, जोशी फूड्स, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशनदेखील या उपक्रमाचे विशेष प्रायोजक आहेत.

भारताबाहेर राहणारे धावपटू आभासी पद्धतीने मॅरेथॉनमध्ये सहभागी होतील, अशी माहिती यावेळी दिली गेली. आर्यक सोल्युशन्स या आयटी कंपनीच्या माध्यमातून यासाठी विशेष अॅप बनवण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य यांनी दिली.

मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरचा एक दिशा मार्ग, आंब्याच्या आकाराचे मेडल, समुद्र किनारी सांगता, ९ गावांमधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग आणि समुद्र किनारी मिळणारा उकडीचा मोदक हे या उपक्रमाचे वेगळेपण आहे. दरवर्षीप्रमाणे अंकिता पाटकर आणि त्यांची झुंबा टीम या मॅरेथॉनच्या आधी झुंबा सेशन घेणार आहे आयपॉपस्टार फेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉनचे गाणे तयार केले आहे.

सुवर्णसूर्य फाउंडेशन व्हिजन २०४७ वर काम करत आहे. पुढील २२ वर्षात १ कोटी फिटनेस टुरिस्ट कोकणामध्ये फाउंडेशनच्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने आले पाहिजेत. त्यांनी किमान २००० रुपये खर्च केला पाहिजे. त्यामुळे कोकणाची उलाढाल २००० कोटीने वाढेल, हे व्हिजन यावेळी श्री. देवस्थळी यांनी पत्रकारांसमोर मांडले.

रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या उपक्रमाविषयी अॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे यांनी विशेष समाधान व्यक्त केले. ज्या हेतूने ही मॅरेथॉन घेतली जाते, तो हेतू अतिशय प्रामाणिक असतो असे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेचे आयोजक असलेल्या सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यावर्षी अतिशय खडतर समजली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन आफ्रिके मध्येसलग ११ तास ३४ मिनिटे धावून पूर्ण करून आले. त्यावेळचा अनुभव सांगताना देवस्थळी म्हणाले की २२,००० सहभागी धावपटूंपैकी १७,००० जण आफ्रिकेमधलेच होते . स्थानिकांचा मोठा सहभाग कुठल्याही स्पर्धेला जास्त मोठे बनवतो आणि म्हणून सर्व कोकणवासियांनी या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिकांना ऑफलाइन नोंदणीची सुविधादेखील आनंद सागर अपार्टमेंट (मजगाव रोड) येथे कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफिसमध्ये करण्यात आली आहे.

पत्रकार परिषदेला अॅऍथलेटिक्स असोसिएशनचे संदीपजी तावडे, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, अॅडव्होकेट सचिन नाचणकर, आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य, डॉक्टर राज कवडे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande