
जळगाव, 10 डिसेंबर (हिं.स.) शहरातील बळीराम पेठ परिसरातील नूर मशीदमध्ये अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून सुमारे अडीच हजार रुपयांची रोकड चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, तक्रार नोंद झाल्यानंतर अवघ्या काही तासांत शहर पोलिसांनी आरोपीला अटक करत दक्षतेचे उत्तम उदाहरण घातले. नूर मशीदीचा दरवाजा उघडा असल्याचे दिसताच परिसरातील काहीजणांना संशय आला. आत पाहणी केली असता दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले. चौकशीत संशयित अब्दुल्ला अकबर खान (५०, रा. कोटा, राजस्थान) हा व्यक्ती दरवाजा उघडून आत शिरल्याचा प्राथमिक अंदाज आल्याने मौलाना शेख साविद शेख सलीम (३०, रा. बळीराम पेठ) यांनी तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. फिर्यादीनुसार, दुपारी २ वाजता आरोपी अब्दुल्ला अकबर खान याच्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आणि काही तासांतच आरोपीला पकडण्यात यश मिळवले.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर