
पालघर, 10 डिसेंबर (हिं.स.)। सफाळे आणि केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांत अंगणवाडी, शाळा व बंगल्यांमधून सुरू असलेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा सफाळे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत पर्दाफाश केला आहे. दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील एकूण २५ गॅस सिलेंडर तसेच मोटारसायकलसह सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सफाळे परिसरातील करवाळे, कमारे, ठाकुरपाडा–करसोंडा आणि माकुणसार गावातील अंगणवाडी, शाळा व बंगल्यांचे दरवाजे तोडून चोरट्यांनी सिलेंडर चोरी केल्याच्या तक्रारी मागील काही दिवसांत नोंद झाल्या होत्या. करवाळे येथे आठ, कमारे येथे पाच, तर ठाकुरपाडा व करसोंडा मिळून तीन तसेच माकुणसार येथे तीन अशा एकूण १९ सिलेंडर चोरीची प्रकरणे समोर आली होती.
या वाढत्या चोरींची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळांची पाहणी, सिसिटीव्ही फुटेज तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने तपास जलद गतीने सुरू केला. संशयितांची हालचाल लक्षात घेऊन पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता त्यांनी सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.
अटक करण्यात आलेले आरोपीमध्ये अजय एकनाथ आबांत (32, रा. बंदाटे) आणि चंदु रमेश वळवी (25, रा. देवशेत) या दोघांकडून चोरी केलेले २५ गॅस सिलेंडर, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या अटकेमुळे सफाळा आणि केळवा पोलीस ठाण्यातील एकूण चार घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी प्रभा राऊळ तसेच सफाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्ता शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL