
जळगाव , 10 डिसेंबर (हिं.स.) जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, जबरी चोरीच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच रावेर तालुक्यामधील वाघोड फाटा वरून पायी जात असलेल्या शोभा सुरेश पाटील (रा. वाघोड) यांना रस्ता विचारण्याचा बहाणा करून तिच्या डोळ्यात माती फेकून गळ्यातील सोन्याची पोत जबरीने चोरून नेल्याची घटना समोर आलीय. यातील दोन्ही आरोपींना अंतुर्ली शिवारात सापळा रचून पोलिसांनी पकडले.वाघोड गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यावर संशयित आरोपींच्या रावेर शहरातील रेकी मोहिमेची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील शेती शिवारात सापळा रचला. अंतुर्ली शिवारात झडपघालून आरोपी मोटारसायकलवर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना रावेर पोलिसांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करून त्यांची मुसक्या आवळल्या. अजय गजानन बेलदार (वय 20) व नरेंद्र उर्फ नीलेश अशोक बेलदार (वय 20), दोघेही अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर अशी आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी कबुली दिली आहे,जप्त 2 लाखांचा मुद्देमाल दोन्ही आरोपींकडून 75 हजारांची मोटारसायकल आणि 1 लाख 75 हजार रुपयांचे 13 ग्रॅम वजनाचे सोने असा तब्बल 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर क्राइम पोलिस कॉ. मिलिंद जाधव आणि गौरव पाटील यांनी तपासासाठी मदत केली. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर