
रायगड, 10 डिसेंबर (हिं.स.)। शहरातील वडाळे तलाव तसेच व्ही. के. हायस्कूल परिसरात हुल्लडबाजी व बेदरकार वाहन चालवणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई केली.
नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली. मागील काही दिवसांपासून या परिसरात काही तरुण दुचाकी व चारचाकी वाहनांवरून मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत, वेगाने वाहन चालवत तसेच सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गोंधळ घालत होते. यामुळे शाळेकडे येण्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक नागरिकांसह विविध सामाजिक संघटना व राजकीय प्रतिनिधींनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभंग आणि विशेष पथकाच्या वतीने अचानक कारवाई करण्यात आली. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणांची झडती घेण्यात आली तसेच काही वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. अनेक वाहनांची तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
अनपेक्षितपणे झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांची चांगलीच तारांबळ उडाली आणि अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. या कारवाईमुळे काही काळ परिसरात शांतता नांदू लागली. या कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे सुरू ठेवण्यात येतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके