
मुंबई, 10 डिसेंबर, (हिं.स.)। ‘गदर 2’ आणि ‘जाट’च्या यशानंतर अभिनेता सनी देओल यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॉर्डर 2’ पुन्हा चर्चेत आला आहे. वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पहिल्या लूकनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
16 डिसेंबरला टीझर रिलीज
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बॉर्डर 2’चा टीझर विजय दिवस 16 डिसेंबर 2025 रोजी मुंबईमध्ये एका भव्य कार्यक्रमात लॉन्च केला जाणार आहे. पूर्वी हा कार्यक्रम अमृतसरमध्ये होणार होता; मात्र काही कारणांमुळे ठिकाण बदलण्यात आले. दिग्दर्शक अनुराग सिंह, कलाकार वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सोनम बाजवा, मोना सिंह आणि मेधा राणा देखील या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
सनी देओलच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह
टीझर लॉन्चच्या घोषणेमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला असला, तरी सनी देओल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या वडिलांचे, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्यानंतर सनी देओल यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पाहिले गेलेले नाही. तरीदेखील, ‘बॉर्डर 2’सारख्या महत्त्वाच्या क्षणी ते उपस्थित राहतील, अशी टीमची अपेक्षा आहे.
‘बॉर्डर 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रचाराला गती मिळण्याची शक्यता असून, प्रेक्षक आता 16 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर