

मुंबई, 10 डिसेंबर (हिं.स.)। टेक क्षेत्रातील दिग्गज गूगलने आपल्या गूगल फोटो ॲपमध्ये व्हिडिओ तयार करणे आणि एडिटिंगसाठी अनेक नवे फीचर्स सादर केले आहेत. या अपडेटची माहिती कंपनीने मंगळवारी अधिकृतपणे दिली. या नव्या सुविधांमुळे आता युजर्सना फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून आकर्षक “हायलाइट रील” बनवता येणार आहे. हे अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आले आहे.
या अपडेटमध्ये नव्याने डिझाइन केलेला व्हिडिओ एडिटर देण्यात आला असून, त्यामध्ये युनिव्हर्सल टाइमलाईन आणि मल्टी-क्लिप एडिटिंगचा सपोर्ट आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक क्लिप्स एडिट करणे अधिक सोपे झाले आहे. याशिवाय, युजर्स आता टेक्स्टसाठी नवीन फॉन्ट्स, रंग आणि बॅकग्राउंड निवडून व्हिडिओला आपल्याप्रमाणे कस्टमाईज करू शकतात. विशेष बाब म्हणजे, टेम्प्लेट्समध्ये आधीपासूनच म्युझिक, टेक्स्ट आणि कट्स सेट केलेले असतात, जे साउंडट्रॅकसोबत आपोआप सिंक होतात. युजर्स फक्त टेम्प्लेट निवडून आवश्यक फोटो-व्हिडिओ सिलेक्ट करू शकतात आणि उर्वरित काम ॲप आपोआप पूर्ण करते.
हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना अँड्रॉइड वरील गूगल फोटो मध्ये “Create” टॅबवर जाऊन “Highlight Video” पर्याय निवडावा लागतो. कंपनीने भविष्यात आणखी नवे टेम्प्लेट्स देण्याचेही आश्वासन दिले आहे. याशिवाय, अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर एक नवीन व्हिडिओ एडिटर सादर करण्यात आला आहे, जो अधिक क्रिएटिव्ह स्टोरीटेलिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे. अडॅप्टिव्ह कॅनव्हाससारखा फिचरही यात देण्यात आला असून, त्यामुळे एडिटिंग प्रक्रिया अधिक सोपी होते.
गूगल च्या माहितीनुसार, रीडिझाइन केलेला हा नवा व्हिडिओ एडिटर आता अँड्रॉइड मध्ये डीफॉल्ट व्हिडिओ एडिटर म्हणून उपलब्ध करण्यात आला आहे. गॅलरीमधील व्हिडिओ क्लिप्स एडिट करण्यासाठीही याचा वापर करता येईल. तसेच एका सिंगल क्लिपमध्येच म्युझिक आणि टेक्स्ट अॅड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. यासोबतच, फोटो ॲपमध्ये नवीन म्युझिक लायब्ररी सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे युजर्स विविध ट्रॅक्स ब्राउझ करून आपल्या हायलाइट रीलसाठी योग्य म्युझिक निवडू शकतात. हे सर्व फीचर्स अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule