सोलापूर - कृषी पर्यटन रिसॉर्टमधून ३२ लाखांचा गुटखा जप्त
सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। सांगोला पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मे. सी.एम. कृषी पर्यटन अॅग्रो रिसॉर्टवर (चिंचोली रोड, चारमिनार कंपनीजवळ) छापा टाकून तब्बल ३२ लाख ४ हजार ४६० रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाल्याच्या साठ्यासह
सोलापूर - कृषी पर्यटन रिसॉर्टमधून ३२ लाखांचा गुटखा जप्त


सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। सांगोला पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मे. सी.एम. कृषी पर्यटन अॅग्रो रिसॉर्टवर (चिंचोली रोड, चारमिनार कंपनीजवळ) छापा टाकून तब्बल ३२ लाख ४ हजार ४६० रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाल्याच्या साठ्यासह ४१ लाख ५४ हजार ४६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश मल्हारी लवटे यांच्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी अवैध तंबाखू साठ्यावर छापा टाकली असता रिसॉर्टच्या विविध खोल्यांमध्ये गुटखासदृश तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवलेले आढळले. घटनास्थळी छोटा हत्ती (एमएच ४५/एएफ ६४०६) व पिकअप (एमएच ४५/एएक्स ०५३९) ही दोन वाहने उभी असल्याचे आढळले. त्या वाहनांमध्येही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ साठवलेले होते.

घटनास्थळी असलेला निशांत ऊर्फ टिल्लू मिसाळ पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे. अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी उपस्थित राहून साठा व वाहने तपासून पंचनामा केला. पंचनाम्यानुसार जप्त साठ्याच्या प्रकारात पानमसाला, सुगंधित तंबाखू, पानमसाला, जर्दा अशा एकूण १४ प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. ३२ लाख ४ हजार ४६० रुपयांच्या या साठ्यासह अंदाजे ३ लाख ५० हजारांचा छोटा हत्ती व अंदाजे ६ लाखांचा पिकअप असा ४१ लाख ५४ हजार ४६० किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande