सीबीआयची मोठी कारवाई : 2 चिनी नागरिकांवर आरोपपत्र
तब्बल एक हजार कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण नवी दिल्ली, 11 डिसेंबर (हिं.स.) : देशातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या जाळ्याविरोधात निर्णायक पाऊल उचलत केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एचपीजेड टोकन गुंतवणूक घोटाळा प्रकरणात दोन चिनी नागरिकांविरुद्ध आरोपप
सीबीआय-लोगो


तब्बल एक हजार कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

नवी दिल्ली, 11 डिसेंबर (हिं.स.) : देशातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या जाळ्याविरोधात निर्णायक पाऊल उचलत केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एचपीजेड टोकन गुंतवणूक घोटाळा प्रकरणात दोन चिनी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कोविड काळात नागरिकांना लक्ष्य करून एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा संगठित अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा या तपासातून समोर आला आहे.

सीबीआयनुसार, चीनमध्ये मालकी असलेल्या शिगू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एचपीजेड टोकन नावाचे बनावट मोबाइल ऍप विकसित केले होते. या ऍपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी माइनिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असा दावा करून हजारो भारतीयांना फसवण्यात आले.या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे चिनी नागरिक वान जून आणि ली आनमिंग यांनी भारतात येऊन कंपनीची रचना आणि पायाभूत सुविधा उभारली होती. त्यानंतर ते देश सोडून गेले आणि परदेशातूनच संपूर्ण फसवणूक रॅकेटचे संचालन करत राहिले. चौकशीदरम्यान सीबीआयला या दोघांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही आणि सध्या ते दोघेही फरार आहेत.

तपासात समोर आले की ही फसवणूक एखाद्या एकट्या गटाची नसून कोविड काळात भारतीय नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा भाग होती. यात लोन ऍप फसवणूक, बनावट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आणि खोट्या ऑनलाइन नोकरीच्या ऑफर्स यांचा समावेश होता.सीबीआयने या प्रकरणात स्थानिक स्तरावरही मोठी कारवाई करत डोर्त्से, रजनी कोहली, सुशांत बेहरा, अभिषेक, मोहम्मद इमधाद हुसैन आणि रजत जैन या सहा जणांना अटक केली. तपासात एकूण 27 जणांचा सहभाग उघडकीस आला असून फसवणुकीचा व्यापक आणि गुंतागुंतीचा विस्तार समोर आला आहे.सध्या सीबीआयने 2 चिनी नागरिकांसह एकूण 30 व्यक्ती आणि 3 कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणामुळे भारतातील सायबर सुरक्षा व्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande