
अमरावती, 11 डिसेंबर (हिं.स.) : सातत्याने हिंदू परंपरा आणि रुढींवर प्रश्न उपस्थित केले जात असून हिंदूंना लक्ष्य बनवले जात असल्याची टीका आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी केली. अलीकडे तामिळनाडूच्या कार्तिगई दीपम वादावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
मद्रास हायकोर्टच्या मदुराई खंडपिठाने 4 डिसेंबरला भाविकांना तिरुपरमकुंद्रम डोंगरावर असलेल्या मंदिरात ‘कार्तिगई दीपम’ जाळण्याची परवानगी दिली होती. तसेच भाविकांना सुरक्षा पुरवावी असे आदेशही न्यायालयाने सीआयएसएफला दिले होते. यानंतर तामिळनाडू सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आणि सर्वोच्च न्यायालयाने 5 डिसेंबरला सुनावणीस तयार असल्याचे सांगितले. यापार्श्वभूमीवर पवन कल्याण म्हणाले की उच्च न्यायालयाने हिंदू समाजाच्या अधिकारांच्या बाजूने निर्णय आल्यावर 100 पेक्षा जास्त खासदारांनी संबंधित न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची मागणी केली. त्यांनी सांगितले की हा निर्णय न्यायिक प्रक्रियेवर दबाव आणण्यासारखा आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सबरीमला मंदिरावर निर्णय दिला, तेव्हा हिंदूंनी कायद्याच्या चौकटीत राहून आपली बाजू मांडली, पण कोणत्याही न्यायाधीशांविरुद्ध महाभियोगाची मागणी कधीच केली गेली नव्हती.
सनातन धर्माची रक्षा फक्त नेत्यांची नाही, तर प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे. त्यांनी ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ तयार करण्याची गरज असल्याचे पवन कल्याण म्हणाले. तसेच त्यांनी तामिळनाडूच्या डीएमके सरकारवर आरोप केला की ती मंदिरांच्या प्रकरणांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप करत आहे आणि काही राजकीय पक्ष ‘खोटे धर्मनिरपेक्षतेचे’ आचरण करत आहेत. हिंदू समाज जात, भाषा आणि प्रदेशावर आधारित विभागलेला आहे. म्हणून हे सांगणे की हिंदू एकत्रित आहेत किंवा बहुसंख्यक असल्यामुळे शक्तिशाली आहेत हा भ्रम आहे. या अंतर्गत विभागांमुळे हिंदूंना त्यांच्या अधिकारांची आणि परंपरांची रक्षा करण्यासाठी अधिक जागरूक होण्याची गरज असल्याचे पनव कल्याण यांनी सांगितले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी