
धर्मशाला, 14 डिसेंबर (हिं.स.)भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ११७ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारताने १५.५ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात १२० धावा करून सामना जिंकला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक १८ चेंडूंत ३५ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
दक्षिण आफ्रिेकेने ठेवलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक आणि शुभमन गिलने भारताला आक्रमक सुरुवात दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माला मैदानात आला होता. तिलक आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावा जोडल्या. पण मार्को जॅनसेनने गिलला बाद केले. गिल २८ चेंडूंत २८ धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळीत पाच चौकारांचा समावेश होता.
कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याने १२ धावा केल्या. त्यानंतर तिलक आणि शिवम दुबे यांनी भारताचा विजय पूर्ण केला. तिलक ३४ चेंडूत २५ धावा करत नाबाद राहिला, ज्यामध्ये तीन चौकारांचा समावेश होता, तर शिवम दुबे चार चेंडूत १० धावा करत नाबाद राहिला, ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकार होता. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी, मार्को जानसेन आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे