नेरळ खांडा गावाचा अभिमान; खेलो मास्टर स्पर्धेत रौप्य पदक
रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो मास्टर क्रीडा स्पर्धेत थाळी फेक (Discus Throw) प्रकारात नेरळ खांडा गावचे रहिवासी गजानन पालू डुकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे नेरळ
नेरळ खांडा गावाचा अभिमान; खेलो मास्टर स्पर्धेत रौप्य पदक


रायगड, 14 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो मास्टर क्रीडा स्पर्धेत थाळी फेक (Discus Throw) प्रकारात नेरळ खांडा गावचे रहिवासी गजानन पालू डुकरे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या या यशामुळे नेरळ व खांडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून क्रीडाप्रेमींमधून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनुभवी व नवोदित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या लढतीत गजानन डुकरे यांनी उत्कृष्ट तंत्र, अचूकता आणि सातत्य दाखवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

गजानन डुकरे हे नियमित सराव, शिस्तबद्ध जीवनशैली आणि क्रीडेसाठीची चिकाटी यासाठी ओळखले जातात. मर्यादित साधनसुविधांमध्येही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

या यशाबद्दल नेरळ खांडा गावातील ग्रामस्थ, स्थानिक क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार तसेच सामाजिक व क्रीडा संघटनांकडून गजानन डुकरे यांचे अभिनंदन करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून भविष्यातही ते अशीच उज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड येथे मिळवलेले हे रौप्य पदक केवळ वैयक्तिक यश नसून नेरळ खांडा गावाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande