
दुबई, 14 डिसेंबर (हिं.स.)भारतीय १९ वर्षांखालील संघाने एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ च्या पाचव्या सामन्यात पाकिस्तान १९ वर्षांखालील संघाचा ९० धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ४६.१ षटकांत २४० धावा केल्या.
पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांत कमी करण्यात आला. प्रत्युत्तरात पाकिस्तान ४१.२ षटकांत १५० धावांतच गारद झाला. भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. यापूर्वी, टीम इंडियाने युएईला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली. गेल्या सामन्याचा हिरो वैभव सूर्यवंशी ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सावरला आणि आरोन जॉर्जसोबत दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. आयुषचा डाव १० व्या षटकात संपला. त्याने २५ चेंडूत ३८ धावा केल्या. युएईविरुद्धच्या मागील सामन्यात ६९ धावा करणारा विहान मल्होत्रा फक्त १२ धावा करू शकला. वेदांत त्रिवेदीने २२ चेंडूत ७ धावांची संथ खेळी केली.
यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडूने २२ धावा करत डाव सावरला. दरम्यान आरोनने ८८ चेंडूंचा सामना केला आणि ८५ धावा केल्या. खालच्या फळीत खिलन पटेलने ६, कनिष्क चौहानने ४६, हेनिल पटेलने १२ आणि दीपेश देवेंद्रनने १ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभानने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. निकब शफीकने २ विकेट्स घेतल्या. अली रझा आणि अहमद हुसेनने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
२४१ धावांचा पाठलाग करताना, पाकिस्तानच्या वरच्या फळीला दीपेश देवेंद्रन नावाच्या वादळाने उध्वस्त केले. दीपेशने पाकिस्तानला सलग तीन झटके दिले. त्याने नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर समीर मिनहासला बाद केले. समीरने २० चेंडूंचा सामना केला आणि नऊ धावा केल्या. मागील सामन्यात समीरने नाबाद १७७ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याची विकेट भारतासाठी महत्त्वाची होती.
दीपेशने ११ व्या षटकात अली हसन बलोच (०) आणि १३ व्या षटकात अहमद हुसेन (४) यांना बाद केले. पाकिस्तानने ३० धावांवर दोन विकेट गमावल्या. अहमद हुसेननंतर सलामीवीर उस्मान खानही झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत १६ धावांची संथ खेळी केली. कर्णधार फरहान युसूफ (२३) वैभव सूर्यवंशीने बाद केले. यष्टीरक्षक हमजा झहूर (४) देखील चांगली कामगिरी करू शकला नाही. अब्दुल सुभानने ६ धावा केल्या.
पाकिस्तानची आशा असलेल्या हुजैफा अहसानला कनिष्क चौहानने बाद केले. त्याने ८३ चेंडूत ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मोहम्मद सय्यमने २ धावा आणि अली राजने ६ धावा केल्या. भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. किशन कुमार सिंग यांनी २ विकेट्स घेतल्या. खिलन पटेल आणि वैभवनेही प्रत्येकी 1 एका फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे