जोस अँटोनियो कास्ट बनले चिलीचे नवे राष्ट्रपती
सॅंटियागो, 15 डिसेंबर (हिं.स.)। चिलीमध्ये होसे अँटोनियो कास्ट यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी केंद्र–डाव्या आघाडी सरकारच्या उमेदवार जॅनेट जारा यांचा पराभव केला. त्यांच्या विजयामुळे देशात बर्‍याच काळानंतर उजव्या विचा
जोस अँटोनियो कास्ट बनले चिलीचे नवे राष्ट्रपती


सॅंटियागो, 15 डिसेंबर (हिं.स.)। चिलीमध्ये होसे अँटोनियो कास्ट यांनी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी केंद्र–डाव्या आघाडी सरकारच्या उमेदवार जॅनेट जारा यांचा पराभव केला. त्यांच्या विजयामुळे देशात बर्‍याच काळानंतर उजव्या विचारसरणीच्या सरकारसाठी मार्ग मोकळा झाला आहे. कास्ट यांना ५८.२ टक्के मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि डाव्या विचारसरणीच्या उमेदवाराला ४१.८ टक्के मते मिळाली.

कास्ट यांनी चिलीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, बेकायदेशीररीत्या देशात आलेल्या लाखो स्थलांतरितांना देशाबाहेर पाठवणे आणि लॅटिन अमेरिकेतील मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर आणण्याची आश्वासने दिली होती. याच मुद्द्यांमुळे त्यांना विरोधकांपेक्षा अधिक पाठिंबा मिळाला.

मतदान संपल्यानंतर अवघ्या दोन तासांपेक्षा कमी वेळात कास्ट यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्या प्रवक्त्या आर्टुरो स्क्वेला यांनी सांगितले की, “चिली सध्या ज्या अडचणींमधून जात आहे, त्या हाताळणे ही मोठी जबाबदारी आहे आणि पक्ष ती अत्यंत गांभीर्याने स्वीकारेल.”

कास्ट हे कट्टर कॅथोलिक असून ते नऊ मुलांचे वडील आहेत. त्यांचे जर्मनीत जन्मलेले वडील अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्या नाझी पक्षाचे नोंदणीकृत सदस्य होते, तर त्यांच्या भावाने त्या काळातील हुकूमशाहीत मंत्री म्हणून काम केले होते. कास्ट हे नैतिकदृष्ट्या पुराणमतवादी विचारसरणीचे नेते मानले जातात. ते समलैंगिक विवाह आणि गर्भपात यांचे कट्टर विरोधक आहेत. याच भूमिकेमुळे ते आपल्या मागील दोन निवडणुकांमध्ये पराभूत झाले होते.

ट्रम्प प्रशासनाने कास्ट यांना त्यांच्या विजयानंतर सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी निवेदनात म्हटले, “त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे. ते चिलीच्या नागरिकांची सुरक्षा मजबूत करणे, बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालणे आणि आमचे व्यापारी संबंध पुन्हा बळकट करणे या प्राधान्यांवर काम करतील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande