
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। लग्जरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किंमतींमध्ये २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही दरवाढ १ जानेवारीपासून लागू होणार असून, कंपनीच्या पोर्टफोलिओमधील इलेक्ट्रिक वाहनांनाही याचा फटका बसणार आहे. यामागचे मुख्य कारण युरो-रुपया विनिमय दर सातत्याने १०० रुपयांच्या वर राहिल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर यांनी सांगितले की, चालू वर्षात युरो-रुपयाचा विनिमय दर अपेक्षेपेक्षा अधिक काळ प्रतिकूल राहिला. या दीर्घकालीन अस्थिरतेचा कंपनीच्या ऑपरेशन्सच्या प्रत्येक टप्प्यावर परिणाम होत आहे. स्थानिक उत्पादनासाठी आयात केलेल्या घटकांपासून ते पूर्णपणे आयात केलेल्या (CBU) वाहनांपर्यंत सर्वच स्तरांवर खर्च वाढला आहे. त्यातच इनपुट खर्च, लॉजिस्टिक्सवरील वाढता खर्च आणि महागाई यांचा एकत्रित परिणाम कंपनीच्या एकूण ऑपरेशनल खर्चावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
किंमतीतील वाढ मॉडेलनुसार वेगवेगळी असणार असून, सर्वाधिक परिणाम पूर्णपणे आयात केलेल्या वाहनांवर होणार आहे. आयात केलेल्या पार्ट्सच्या आधारे स्थानिक पातळीवर असेंबल होणाऱ्या कार्सच्या किंमतीही वाढणार आहेत. मर्सिडीज-बेंझ आपल्या पुणे येथील प्लांटमध्ये A-Class लिमोझिन, GLA, C-Class, GLC, E-Class LWB, GLE, S-Class, GLS, Maybach S 580, EQS 580 सेडान आणि EQS SUV 450 या मॉडेल्सचे असेंब्ली करते. उर्वरित EV, Maybach आणि AMG परफॉर्मन्स मॉडेल्स आयात केले जातात.
दरम्यान, किंमतवाढीवर बोलताना अय्यर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सातत्याने रेपो दरात कपात केल्याबद्दल कौतुक केले. त्यामुळे मर्सिडीज-बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ग्राहकांना फायदा होत असून, दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी होतो, असे त्यांनी सांगितले. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी सुमारे ५० टक्के विक्रीत फायनान्शियल सर्व्हिसेसचा वाटा असून, मर्सिडीज-बेंझ कार खरेदी करणाऱ्या सुमारे ८० टक्के ग्राहक फायनान्सिंगचा वापर करतात, असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule