
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। स्वदेशी कार निर्माता टाटा मोटर्सने अखेर आपल्या बहुप्रतीक्षित नव्या टाटा सिएरा एसयूव्हीच्या टॉप-स्पेक Accomplished आणि Accomplished+ या व्हेरिएंट्सच्या किंमती अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत. कंपनीकडून या कारची बुकिंग 16 डिसेंबरपासून सुरू केली जाणार असून, 15 जानेवारी 2026 पासून ग्राहकांना डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने Sierra च्या इतर सर्व व्हेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या होत्या, मात्र टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट्सच्या किंमती उघड केल्या नव्हत्या.
जाहीर झालेल्या माहितीनुसार, टाटा सिएरा Accomplished व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.99 लाख रुपयांपासून 19.99 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. तर सर्वाधिक प्रीमियम असलेल्या Accomplished+ व्हेरिएंटची किंमत 20.29 लाख रुपयांपासून 21.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. यामुळे Accomplished+ हा सिएरा पोर्टफोलिओमधील सर्वात महागडा व्हेरिएंट ठरतो.
टाटा सिएरा मध्ये विविध इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे 1.5-लीटर नेचुरली-अॅस्पिरेटेड Revotron पेट्रोल इंजिन Accomplished ट्रिममध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्याची किंमत 17.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र हे इंजिन पूर्णपणे लोडेड Accomplished+ व्हेरिएंटमध्ये दिले जाणार नाही. याशिवाय 1.5-लीटर T-GDI टर्बो-पेट्रोल इंजिन फक्त ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असून, त्याची किंमत Accomplished व्हेरिएंटसाठी 19.99 लाख रुपये आणि Accomplished+ साठी 20.99 लाख रुपये आहे.
डिझेल ग्राहकांसाठी 1.5-लीटर Kryojet डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. सिएरा Accomplished डिझेल मॅन्युअलची किंमत 18.99 लाख रुपये असून, ऑटोमॅटिक व्हर्जनसाठी 19.99 लाख रुपये मोजावे लागतील. तर Accomplished+ डिझेल मॅन्युअलसाठी 20.29 लाख रुपये आणि ऑटोमॅटिकसाठी 21.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत ठेवण्यात आली आहे.
फीचर्सच्या बाबतीत Accomplished व्हेरिएंटमध्ये Adventure+ च्या तुलनेत मोठी अपग्रेड्स देण्यात आली आहेत. यामध्ये लेव्हल-2 ADAS, लेदरेट अपहोल्स्ट्री, ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड-अप डिस्प्ले, डॉल्बी अॅटमॉससह 12 JBL ब्लॅक स्पीकर्स, सहा-वे पॉवर अॅडजस्टमेंट असलेली वेंटिलेटेड ड्रायव्हर सीट, वायरलेस चार्जर, पडल लॅम्प्स, डॅशबोर्डपुरते मर्यादित अॅम्बियंट लाइटिंग आणि एक्सप्रेस कूलिंगसारखी फीचर्स मिळतात.
सर्वात प्रीमियम Accomplished+ व्हेरिएंटमध्ये याहूनही अधिक अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात समोरच्या प्रवाशासाठी तिसरी स्क्रीन, 22 फंक्शन्ससह लेव्हल 2+ ADAS, ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शन, जेस्चर कंट्रोलसह पावर्ड टेलगेट तसेच मागील प्रवाशांसाठी दोन 65W USB-C पोर्ट्सचा समावेश आहे. एकूणच, नव्या टाटा सिएराच्या टॉप व्हेरिएंट्समुळे मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule