
मुंबई, 15 डिसेंबर (हिं.स.)। रिअलमी भारतात 16 डिसेंबर रोजी आपली नवी नार्झो 90 सिरीज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या सिरीजमध्ये रिअलमी नार्झो 90 5G आणि रिअलमी नार्झो 90x 5G असे दोन स्मार्टफोन्स असणार आहेत. लॉन्चपूर्वीच या फोन्सच्या किंमत, रंग पर्याय आणि प्रमुख फीचर्सची माहिती समोर आली आहे. रिअलमीने आपल्या अधिकृत वेबसाइट आणि अॅमेझॉनवरील मायक्रोसाइटद्वारे अनेक तपशील कन्फर्म केले आहेत.
कंपनीच्या माहितीनुसार, दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 7,000mAh क्षमतेची मोठी टायटन बॅटरी देण्यात येणार असून ती 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. प्रसिद्ध टेक ब्लॉगर पारस गुगलानी यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, Realme Narzo 90 5G ची भारतातील संभाव्य किंमत सुमारे 17,999 रुपये असू शकते, तर Narzo 90x 5G अंदाजे 14,999 रुपयांत लॉन्च होऊ शकतो. मात्र, या किंमती बँक ऑफर्स आणि लॉन्च डिस्काउंटसह सांगितल्या जात असल्याने प्रत्यक्ष MRP थोडी अधिक असण्याची शक्यता आहे. कंपनीने अद्याप अधिकृत दर जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे ही माहिती लीक स्वरूपात पाहावी लागेल.
रंग पर्यायांबाबत सांगायचे झाल्यास, Narzo 90 5G हा Victory Gold आणि Carbon Black या दोन रंगांत उपलब्ध होणार आहे, तर Narzo 90x 5G हा Nitro Blue आणि Flash Blue शेड्समध्ये येईल. Narzo 90 5G चे वजन सुमारे 181 ग्रॅम असून त्याची जाडी केवळ 7.79mm असल्याचे सांगितले जात आहे.
फीचर्सच्या बाबतीत दोन्ही फोन दमदार ठरणार आहेत. 7,000mAh बॅटरीसोबतच Narzo 90 5G मध्ये बायपास चार्जिंग आणि वायर्ड रिव्हर्स चार्जिंगसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत. कॅमेरा विभागात दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा मिळेल. विशेष म्हणजे Narzo 90 5G ला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात येणार आहे, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून चांगल्या प्रमाणात सुरक्षित राहील.
रिअलमी नार्झो 90 सिरीजची विक्री भारतात अॅमेझॉन आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवरून होण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबरच्या लॉन्चकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले असून, बजेट सेगमेंटमध्ये ही सिरीज किती प्रभाव पाडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule