
जळगाव, 16 डिसेंबर, (हिं.स.) सुप्रीम कॉलनीतील एका बंद घरातून रोकडसह सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेणाऱ्या २ सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात कासमवाडीतून अटक केली आहे. शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर (रा. कासमवाडी, जळगाव) आणि साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या (रा. तांबापुरा, जळगाव) असं अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
फिर्यादी शरीफ मुराद खाटिक, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव हे चाळीसगाव येथे एका लग्न समारंभासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड यांना माहिती मिळाली की गुन्हेगार शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर व आणि साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या या दोघांनी चोरी केली आहे. या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कासमावडी परिसरातून आरोपींना त्वरित ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्हा कबूल केल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर