मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आदित्य ठाकरेंकडे
मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती एकत्र लढणार असताना, मुंबई महापालिका आपल्
aditya thackeray


मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती एकत्र लढणार असताना, मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं चित्र आहे. पुढील आठवडाभरात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मुंबईत होणाऱ्या प्रचारसभा, मेळावे आणि विविध जनसंवाद कार्यक्रमांची आखणी व अंमलबजावणी आदित्य ठाकरे करणार आहेत. विशेषतः युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि शहरी समस्यांवर केंद्रित मुद्दे प्रचारात प्रभावीपणे मांडण्याची रणनीती आखली जात आहे.

शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. महापालिकेतील विविध प्रकल्प, प्रशासक नेमणुकीनंतर निर्माण झालेला गोंधळ तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रश्नांची आणि अडचणींची त्यांना सखोल जाण असल्याचं पक्षाकडून सांगितलं जात आहे. याच मुद्द्यांवर आधारित प्रचाराची दिशा ठरवण्याचं काम आदित्य ठाकरे करत असल्याचं दिसून येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार यादीतील कथित घोटाळे यांसारख्या मुद्द्यांवरही आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुका लढवल्या जात असताना, पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी आदित्य ठाकरे यांनी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे राज्यभरातील महापालिकांवर लक्ष ठेवणार असताना, आदित्य ठाकरे मुंबईसह तीन ते चार महत्त्वाच्या महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.

मुंबईबरोबरच नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रचारातही आदित्य ठाकरे सहभागी होणार असून, या ठिकाणीही मेळावे आणि प्रचारसभांचं आयोजन केलं जाणार आहे. येणारी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात असल्याने, आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळताना दिसत आहेत.

राज्यात १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जोरदार राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande