
अमरावती, 16 डिसेंबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध प्रभागांतून इच्छुक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांच्या आधारे या मुलाखती घेण्यात येणार असून, गुरुवार दिनांक १८ डिसेंबर २०२५ आणि शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत या मुलाखती होणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनानुसार यासाठी विशेष “पार्लिमेंटरी बोर्ड” स्थापन करण्यात आले आहे. या बोर्डामध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष बबलु शेखावत यांच्यासह प्रभारी डॉ. झीशान हुसैन, खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री श्रीमती यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, दिलीप एडतकर, भैय्या पवार, किशोर बोरकर, आसिफ तवक्कल, नजीर खान बी.के., शहर महिला अध्यक्षा जयश्रीताई वानखडे, निलेश गुहे, वैभव देशमुख, अब्दुल रफीक, संकेत साहू यांचा समावेश आहे.
हे पार्लिमेंटरी बोर्ड सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पक्षाच्या विचारधारेनुसार, जनतेशी नाळ जोडणारे, समर्पित व विकासाभिमुख उमेदवारांची निवड करणार आहे. या पारदर्शक प्रक्रियेद्वारे काँग्रेस पक्ष अमरावती शहराला मजबूत, समावेशक व न्यायपूर्ण नेतृत्व देण्याच्या दिशेने पुढे जात आहे.काँग्रेस पक्ष समता, न्याय, धर्मनिरपेक्षता, सामाजिक समरसता तसेच गरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला व युवकांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शहरातील पाणीपुरवठा, रस्ते व पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, युवकांसाठी रोजगार आणि वंचित घटकांसाठी न्यायपूर्ण योजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
गुरुवार १८ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६, ८, ११, १४, १५, १६, २१ व २२ मधील उमेदवारांच्या, तर शुक्रवार १९ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक १, २, ७, ९, १०, १२, १३, १७, १८, १९ व २० मधील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत.
या मुलाखती काँग्रेस भवन, नवीन इमारत, शिवटेकडी (मालटेकडी बाजूला), अमरावती येथे होणार असून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागानुसार निश्चित वेळेआधी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस कमिटीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी