
धुळे, 16 डिसेंबर (हिं.स.) | महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये आपला उमेदवार कोणी व्यक्ती नव्हे, तर पक्षाचे चिन्ह कमळाचे फूल असेल. आता आपला ५५ प्लस हा एकच नारा असून, कमळ विजय यात्रेच्या माध्यमातून घरोघरी प्रचार करा.पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या विजयासाठी सवारनी एकोप्याने काम करा. आपसांतील हेवेदावे बाजूला सारून पक्ष आणि पक्षाच्या चिन्हासाठी झटा. कमळ विजय यात्रा घरोघरी पोहोचवा. यातून महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शहराचे कार्यकर्तृत्ववान आमदार अनुपभय्या अग्रवाल यांनी व्यक्त केला.
धुळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे नेते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व कार्यकत्यारची बैठक झाली, यात आ.अनुप अग्रवाल बोलत होते.
आमदार अग्रवाल म्हणाले, की महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आणण्यासाठी आता आपल्या हाती एक महिना आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. यात सगळेच तोलामोलाचे आहेत.मात्र, १७ प्रभागांत प्रत्येकी चार, तर दोन प्रभागांत तीन उमेदवार असतील. यामुळे इतरांनी नाराज होण्याचे कारण नाही. काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलावी लागतील. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील. प्रत्येक वेळी ठराविक व्यक्तीनाच उमेदवारी मिळेल, असे काही नाही. पक्षाचे सर्व्हे सुरू आहेत. नेते सर्व परिस्थिती जाणून आहेत. त्यांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. यामुळे कोणाही भ्रमात राहू नये. पक्ष जो निर्णय घेईल तो शिरसावंद्य मानून प्रत्येकाने पक्षासाठी काम करावे.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. सुशील महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, शशी मोगलाईकर, पवन जाजू, सुनील कपिल, महानगर जिल्हा उपाध्यक्ष यशवंत येवलेकर, पृथ्वीराज पाटील, मंडळाध्यक्ष अमोल मासुळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर