
कॅमेरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटपटू
अबू धाबी, 16 डिसेंबर,(हिं.स.)आयपीएल २०२६ चा मेगा लिलाव अपेक्षेप्रमाणेच झाला. अनुभवी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला मोठी बोली लागली. आणि तो या हंगामातील सर्वात मागणी असलेला क्रिकेटपटू बनला आहे. ग्रीनने २ कोटी बेस प्राईस घेऊन या लिलावात प्रवेश केला होता. ग्रीनला कोलकाताने २५.२० कोटींमध्ये खरेदी केले. तो गोलंदाजीसाठी उपलब्ध असेल की, नाही याबद्दल अनिश्चितता होती. पण त्याने स्पष्ट केले की, तो गोलंदाजी करेल. यामुळे त्याचे मूल्य आणखी वाढले, कारण टी२० मध्ये अष्टपैलू क्रिकेटपटूंना अधिक प्राधान्य दिले जाते.
मुंबई इंडियन्सने सुरुवातीला ग्रीनसाठी बोली लावली, पण नंतर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये लढाई सुरू झाली. राजस्थानने १३.६० कोटींमध्ये माघार घेतली. कोलकाता ग्रीनला घेईल असे वाटत असतानाच चेन्नई सुपर किंग्ज लिलावात उतरले आणि ग्रीनची बोली २० कोटीच्या पुढे गेली. चेन्नईने कधीही कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एवढी बोली लावली नव्हती.त्याची बोली लवकरच २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. ज्यामुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी क्रिकेटपटू ठरला. शेवटी कोलकाताने बोली जिंकली.
कॅमेरॉन ग्रीनला २५.२० कोटी रुपयांना विकले गेले असेल तरी त्याच्या खात्यात फक्त १८ कोटी रुपये जमा होतील. उर्वरित ७ कोटी २० लाख रुपये बीसीसीआयकडे जातील. बोर्ड ते क्रिकेटपटूंच्या कल्याणासाठी खर्च करेल.
बीसीसीआयच्या 'कमाल शुल्क' नियमामुळे ग्रीनला कोट्यवधी रुपये गमवावे लागतील. नियमांनुसार, लिलावात परदेशी क्रिकेटपटूची कमाल किंमत ही सर्वोच्च रिटेन्शन स्लॅब (१८ कोटी रुपये) मधील सर्वात कमी आणि मागील मेगा लिलावात सर्वात महागड्या क्रिकेटपटूची किंमत असते, लिलावादरम्यान क्रिकेटपटूची बोली काहीही असो.
यावेळी, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक रिटेन्शन स्लॅब १८ कोटी रुपये होता. दरम्यान, आयपीएल २०२५ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात ऋषभ पंत सर्वात महागडा क्रिकेटपटू होता. लखनऊ सुपर जायंट्सने भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजाला २७ कोटींमध्ये खरेदी केले होते. दोघांपैकी सर्वात जास्त रिटेन्शन स्लॅब कमी आहे (१८ कोटी). परिणामी, कॅमेरॉन ग्रीनला केवळ १८ कोटी मिळणार आहेत.
२०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने ग्रीनला विकत घेतले होते. या हंगामात, मुंबई इंडियन्सने 1७.५० कोटी दिले होचे. ग्रीनने १६ सामने खेळले आणि ४५२ धावा केल्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. २०२४ मध्ये, ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सामील झाला, जिथे मुंबईने त्याला आरसीबीला विकले. ग्रीनने १३ सामने खेळले आणि २५५ धावा केल्या. पण एकही अर्धशतक केले नाही. दुखापतीमुळे तो २०२५ चा हंगाम खेळला नव्हता आणि त्याच्या अनुपस्थितीत आरसीबीने आयपीएल स्पर्धेचे अंजिंक्यपद पटकावले होते. या हंगामात ग्रीनला मोठी कमाई होईल अशी अपेक्षा होती कारण त्याचा खेळ सुधारला होता आणि अनेक संघांकडे त्याच्यासारखा अष्टपैलू क्रिकेटपटू नसल्याने त्याचे महत्त्व वाढले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे