
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषदेतर्फे विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात येणारा ‘यहाँ के हम सिकंदर’ हा सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी चिपळूणला होणार आहे.
चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सकाळी १० वाजल्यापासून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
‘यहाँ के हम सिकंदर’ हा महोत्सव म्हणजे बालदिव्यांग मुलांच्या कलाकौशल्यांचा उत्सव असून तो स्पर्धात्मक नसून प्रोत्साहनात्मक स्वरूपाचा आहे. ३ ते ३१ डिसेंबर या कालावधीत बालरंगभूमी परिषदेच्या विविध शाखांमध्ये हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील कर्णबधिर, मूकबधिर, अंध, गतिमंद, अस्थिव्यंग अशा विविध प्रकारातील दिव्यांग मुलांना सहभागी होता येणार आहे. १८ वर्षांखालील दिव्यांग मुले व मुली या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक संघामध्ये किमान ६ ते कमाल १५ बालकलावंतांचा सहभाग अपेक्षित आहे.
महोत्सवात नाट्य, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, कोलाज, मातीकाम, शिल्पकला, जादूचे प्रयोग आदी विविध कलांचे सादरीकरण करता येणार आहे. प्रत्येक संघाला १० मिनिटे तयारीसाठी व १० मिनिटे सादरीकरणासाठी देण्यात येणार असून आवश्यक ध्वनी व प्रकाश व्यवस्था आयोजकांकडून पुरवली जाणार आहे. सहभागी शाळा किंवा संस्थांना किमान ३,००० रुपये (मानधन व प्रवास खर्च) देण्यात येणार असून प्रत्येक सहभागी बालकलावंतास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
मुलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात येत असून प्रत्येक संघासोबत प्रशिक्षित शिक्षक अथवा पालक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाचा गौरवचिन्ह देऊन विशेष सन्मान केला जाणार आहे. महोत्सवस्थळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याचीही मुभा देण्यात आली आहे. सहभागी सर्व बालकलावंतांना तसेच उपस्थित दिव्यांग बालप्रेक्षकांना सुका खाऊ देण्यात येणार आहे.
विशेष मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. चिपळूणवासीयांनी या विशेष मुलांच्या कलागुणांना दाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालरंगभूमी जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार सुचय रेडीज यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी