
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेड येथील आय. सी. एस महाविद्यालयात आयोजित मुंबई विद्यापीठाच्या विसाव्या रत्नागिरी विभागीय आविष्कार संशोधन स्पर्धेत यश संपादन केले.
महाविद्यालयाच्या एका प्रकल्पाला प्रथम व दुसऱ्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या स्पर्धेत रसायनशास्त्र विषयाच्या प्रथम क्रमांक प्राप्त अनुष्का नागवेकर (द्वितीय वर्ष बीएस्सी) व संगीता कांबळे (प्रथम वर्ष बीएस्सी) या विद्यार्थिनींनी नैसर्गिक आणि कृत्रिम निर्देशकांचा तुलनात्मक अभ्यास हा प्रकल्प सादर केला. त्यांना प्रा. आसावरी मयेकर यांनी मार्गदर्शन केले. प्राणिशास्त्र विषयाच्या तृतीय क्रमांक प्राप्त स्वराली इंदुलकर, समृद्धी बोरकर, सिद्धी सुर्वे व यश कदम या द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी जड धातू काढण्यासाठी बायोपॉलिमर हा प्रकल्प सादर केला. त्यांना प्रा. सानिका कीर यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही गटांनी आविष्कार स्पर्धेत यश संपादन केले आहे आविष्कार स्पर्धेच्या मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महाविद्यालयातील एकूण ७ संशोधन प्रकल्प स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या आविष्कार रिसर्च समितीच्या प्रमुख प्रा. सानिका कीर व सहायक प्राध्यापक आसावरी मयेकर उपस्थित होत्या. प्र. प्राचार्य मधुरा पाटील व उपप्राचार्य, विभागप्रमुख व संस्था पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी