
नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.)। भारताने मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली असून ‘ध्रुव64’ हा देशातील पहिला स्वदेशी मायक्रोप्रोसेसर म्हणून सादर करण्यात आला. 1.0 गीगाहर्ट्झ क्षमतेचा, 64-बिट ड्युअल-कोर असलेला हा प्रोसेसर पूर्णतः देशातच विकसित करण्यात आला आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (C-DAC) यांनी मायक्रोप्रोसेसर डेव्हलपमेंट प्रोग्राम (MDP) अंतर्गत हा प्रोसेसर तयार केला असून डिजिटल इंडिया RISC-V (DIR-V) उपक्रमांतर्गत तो सादर करण्यात आला आहे. ओपन-सोर्स RISC-V आर्किटेक्चरचा वापर करून चिप डिझाइन, टेस्टिंग आणि प्रोटोटायपिंगला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मायक्रोप्रोसेसर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचा मेंदू मानला जातो. स्मार्टफोन, संगणक, वैद्यकीय उपकरणे, औद्योगिक यंत्रणा तसेच इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) डिव्हाइसेस या सर्वांचे कार्य मायक्रोप्रोसेसरवर अवलंबून असते. सॉफ्टवेअरमधील सूचनांची अंमलबजावणी करून हार्डवेअर योग्य पद्धतीने कार्यरत ठेवण्याचे काम तो करतो. ‘ध्रुव64’ हा RISC-V या ओपन आणि रॉयल्टी-फ्री इन्स्ट्रक्शन सेटवर आधारित असल्याने त्याच्या वापरासाठी कोणतेही महागडे लायसन्स शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे भारतीय संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योगांना चिप डिझाइनमध्ये नवोन्मेष करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.
‘ध्रुव64’ ची 1.0GHz क्लॉक स्पीड, 64-बिट ड्युअल-कोर रचना आणि विश्वासार्ह डिझाइन यामुळे तो 5G इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशनसाठी उपयुक्त ठरणार आहे. भारत जगातील सुमारे 20 टक्के मायक्रोप्रोसेसर वापरतो, मात्र आजपर्यंत त्यापैकी बहुतांश प्रोसेसर आयात केले जात होते. ‘ध्रुव64’ सारख्या स्वदेशी डिझाइनमुळे ही आयातीवरील अवलंबनता कमी होणार असून देशांतर्गत चिप इकोसिस्टम मजबूत होण्यास मदत होणार आहे. संरक्षण आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी स्वदेशी चिपचा वापर केल्यास सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठा लाभ होणार आहे.
हा मायक्रोप्रोसेसर एका दीर्घकालीन रोडमॅपचा भाग असून यामध्ये यापूर्वी भारतात डिझाइन करण्यात आलेले थेजस32, थेजस64, तसेच सध्या विकासाधीन असलेले धनुष आणि धनुष+ या प्रोसेसरचा समावेश आहे. याशिवाय DIR-V, इंडिया सेमीकंडक्टर मिशन, चिप्स टू स्टार्टअप (C2S), डिझाइन लिंक्ड इन्सेंटिव्ह (DLI) आणि INUP-i2i यांसारखे राष्ट्रीय उपक्रम स्वदेशी चिप डिझाइनला सक्रियपणे पाठबळ देत आहेत. ‘ध्रुव64’ मुळे भारताची तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule