गडचिरोली - जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे 26 डिसेंबर रोजी आयोजन
गडचिरोली., 16 डिसेंबर (हिं.स.) पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गडचिरोली तालुक्यातील मौजा कनेरी (पारडी) येथील प्रियंका हायस्कूल स
गडचिरोली - जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे 26 डिसेंबर रोजी आयोजन


गडचिरोली., 16 डिसेंबर (हिं.स.) पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचे आयोजन दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गडचिरोली तालुक्यातील मौजा कनेरी (पारडी) येथील प्रियंका हायस्कूल समोरील शंकरपटाच्या मैदानावर करण्यात आले आहे. या पशुप्रदर्शनीत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांसाठी सहभागाची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या पशुप्रदर्शनीत गाय व म्हैस वर्ग, शेळी, कुक्कुट आदी पशुधनाचा समावेश राहणार असून सहभागी पशुपालकांना आपल्या पशुंची नि:शुल्क नोंदणी करून प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. पशुपालन क्षेत्रातील प्रगती, सुधारित पशुसंवर्धन पद्धतींचा प्रसार तसेच गुणवत्तापूर्ण पशुधनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनीच्या दिवशी सकाळी 8.00 ते 11.00 या वेळेत पशुंची नोंदणी करण्यात येणार असून सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत उत्कृष्ठ पशुंची निवड करण्यात येईल. यावेळी मान्यवरांचे मार्गदर्शन शेतकरी व पशुपालकांना लाभणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उत्कृष्ठ पशुधनासाठी बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या जिल्हास्तरीय पशुप्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय गडचिरोली डॉ. गणेश मेश्राम यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande