रायगड - जिल्ह्यात १८ जानेवारीपर्यंत मनाई आदेश
रायगड, 16 डिसेंबर (हिं.स.) राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका कार्यक
आठ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले


रायगड, 16 डिसेंबर (हिं.स.) राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणूक २०२५ चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर १५ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि कायदा–सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १८ जानेवारी २०२६ पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३३ (१)(प) अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक तेढ निर्माण होऊ नये तसेच जनजीवन सुरळीत राहावे, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय पक्षांकडून झेंडे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर्स, कटआउट्स, कमानी व पताका उभारल्या जातात. अनेकदा या साहित्यामुळे रस्त्यावर दोऱ्या, काठ्या अडथळा ठरून रहदारी खोळंबते. तसेच अशा कारणांवरून वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता असते, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा होईल, उजेड व हवा अडवली जाईल अशा प्रकारे प्रचार साहित्य लावण्यास मनाई करण्यात आली आहे. खाजगी जागेवर प्रचार साहित्य लावायचे असल्यास जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असून, त्या परवानगीची प्रत तीन दिवसांत स्थानिक पोलीस ठाणे व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे.

हा आदेश १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून १८ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३१ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande