

नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.)। मेसर्स टिटागड रेल सिस्टीम लिमिटेडने स्वदेशी बनावटीने तयार केलेल्या पाच डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट (डीएससी) पैकी पहिल्या, 'डीएससी ए20', या वाहनाला भारतीय नौदलाने 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथील नौदल तळावर समारंभपूर्वक ताफ्यात दाखल केले.
व्हाईस ॲडमिरल समीर सक्सेना, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिणी नौदल कमांड यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि व्हाईस ॲडमिरल संजय साधू, कंट्रोलर ऑफ वॉरशिप प्रोडक्शन अँड ॲक्विझिशन यांनी त्याचे आयोजन केले होते. यावेळी वरिष्ठ नौदल अधिकारी, मेसर्स टिटागढ रेल सिस्टीम लिमिटेड, कोलकाताचे प्रतिनिधी आणि मान्यवर पाहुणे उपस्थित होते.
12 फेब्रुवारी 2021 रोजी पाच डायव्हिंग सपोर्ट क्राफ्टच्या बांधकामासाठी संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स टिटागड रेल सिस्टम लिमिटेड, कोलकाता यांच्यात करार करण्यात आला. जहाजाचे डिझाइन तयार करण्याच्या टप्प्यात, त्याचे हायड्रोडायनामिक विश्लेषण आणि मॉडेल चाचणी नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम येथे करण्यात आली
डीएससी ए20 या जहाजाची रचना आणि बांधणी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग च्या वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे एक कॅटामरान-आकाराचे जहाज असून, त्याचे विस्थापन अंदाजे 390 टन आहे. अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणांनी सुसज्ज असलेले हे जहाज पाण्याखालील दुरुस्ती आणि तपासणी, बंदरातील क्लिअरन्स आणि किनारपट्टीलगत पाण्यातील महत्त्वाच्या डायव्हिंग मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
डीएससी ए20 चे कार्यान्वयन हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला बळकटी देतो. भारतीय नौदलात अशा विशेष प्लॅटफॉर्मची स्वदेशी बांधणी ही देशांतर्गत क्षमतांमधील वाढ, आत्मनिर्भरता आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्याचे प्रतीक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule