रायगड - गोखले महाविद्यालयाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
रायगड, 16 डिसेंबर (हिं.स.)। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२५’ मधील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (Best College – Mahara
श्रीवर्धन


रायगड, 16 डिसेंबर (हिं.स.)। गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२५’ मधील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (Best College – Maharashtra – Shreewardhan, Raigad) हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे ESFE संघटनेच्या वतीने आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.

सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे गोखले महाविद्यालयाची गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून असलेली ओळख अधिक भक्कम झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार उच्च शिक्षण, संशोधन व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची ही दखल असल्याचे मानले जात आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीचे हे महाविद्यालय श्रीवर्धन तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय असून ISO 9001:2015 प्रमाणित आहे. महाविद्यालयाला NAAC कडून ‘B’ ग्रेड तसेच UGC 2(f) आणि 12(B) अंतर्गत मान्यता प्राप्त आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भागात असलेले हे महाविद्यालय गेल्या १२ वर्षांपासून वनस्पतीशास्त्र (Botany) विषयातील पीएच.डी. संशोधन केंद्र यशस्वीपणे चालवत आहे.

या संशोधन केंद्रातून आतापर्यंत १० विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली असून, ते महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापन कार्य करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संशोधनाच्या दृष्टीने ही मोठी संधी ठरली आहे.

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालय विकास समिती, माजी विद्यार्थी संघटना तसेच विद्यमान विद्यार्थ्यांनी प्र. प्राचार्य प्रा. डॉ. विवेक खरे यांचे अभिनंदन केले आहे. ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२५’ हा सन्मान म्हणजे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande