चतुरंग प्रतिष्ठान परभणीतर्फे यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स)आपण हजारो वर्षे जपलेली समाजव्यवस्था खराब करण्याचे काम हल्लीची काही समाजमाध्यमे करीत आहेत. सायबर सिक्युरिटी नावालाच असल्याने एआय सारख्या नव तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे महिलांची सुरक्षितता देखील धोक्यात आली असून ही अतिशय गंभ
चतुरंग व्याख्यानमालेत कवयित्री गुंजन पाटील यांचे प्रतिपादन


परभणी, 16 डिसेंबर (हिं.स)आपण हजारो वर्षे जपलेली समाजव्यवस्था खराब करण्याचे काम हल्लीची काही समाजमाध्यमे करीत आहेत. सायबर सिक्युरिटी नावालाच असल्याने एआय सारख्या नव तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे महिलांची सुरक्षितता देखील धोक्यात आली असून ही अतिशय गंभीर बाब आहे, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील कवयित्री गुंजन पाटील यांनी केले.

चतुरंग प्रतिष्ठान, परभणीतर्फे आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे हे व्याख्यानमालेचे 21 वे वर्ष आहे. यंदाचे पुष्प कवयित्री पाटील यांनी गुंफले. दीपप्रज्वलन प्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ.सुनिता मारोती कुकडे, मीनाताई अजितराव देशमुख, स्नेहलता काशिनाथ शिवपुजे, मीनाक्षी अमोल क्षीरसागर, कविता विलास पानखडे यांची उपस्थिती होती. यावेळी कवयित्री पाटील यांनी समाज माध्यमांचे महिलांच्या जीवनावर होणारे परिणाम व बदलते सामाजिक संदर्भ” या विषयावर आपले विचार मांडून स्वरचित ' बायको', ' प्रेमातला भ्रष्टाचार', ' मुलींना सारं कळतं' आदी कविता सादर केल्या.

कवयित्री पाटील म्हणाल्या की, चांगला देश घडविण्याची जबाबदारी असलेली माध्यमे केवळ मनोरंजनासाठीच असून त्यांनी समाजासाठी कुठलंच काम करणं सोडून दिलंय, असेच चित्र आहे. आजची माध्यमं रशिया-युक्रेनचे युद्ध दाखवू शकतात पण मणिपूरमधला हिंसाचार दाखवू शकत नाहीत.तुम्ही कोणीही महिलांची पारख करत नाहीत. मिडियाने सॉफ्ट टार्गेट असलेल्या महिलांना विकाऊ वस्तू बनवले आहे. ७४% जाहिरातीमध्ये महिलांना देखणं साधन म्हणून वापरलं गेलं आहे. त्याचा परिणाम असा झाला की समाजातील सगळ्या महिलांना आपण देखील ब्युटीफिकेशनच्या पॕरामिटरमध्ये (साच्यात) बसावं वाटायला लागलंय. त्यातून समाज माध्यमांवर स्वतःचे खाजगी फोटो टाकले जातात आणि जिच्या फोटोंवर जास्त लाईकस् ती सर्वात जास्त सुंदर असं समजल्या जाऊ लागलं. स्त्रीला स्त्री प्रकृती बनवत नाही तर स्त्रीला स्त्री संस्कृती बनवते. आज सोशल मिडियावर असलेल्या ५०० मिलीयन अकाउंट्सपैकी २०० मिलीयन अकाउंट्स महिलांची आहेत.सायबर टाॕकींगमुळे जया किशोरीसारखी महिला बाहेर पडायला घाबरतेय. आज घरात नवीन साडी आलेली आपल्याला स्टेटसमुळे कळतंय. स्टेटसवर सुखी दिसणारी माणसं आज खरंच सुखी आहेत का? हा प्रश्न आहे.कवी दुष्यंतकुमार यांची कवितेच्या ओळी सांगत, प्रत्येक पुरुषामध्ये कोमलता असावी तशी प्रत्येक महिलेमध्ये कठोरता व निडरता असावी असा विचार त्यांनी मांडला. कवयित्री पाटील यांनी सादर केलेल्या ' मला आई व्हायचं नाही' या कवितेने रसिक श्रोते अंतर्मुख झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ.उषा नितीन लोहट यांनी २००५ साली स्थापन झालेल्या चतुरंग प्रतिष्ठानने गेल्या २० वर्षात परभणीसाठी घडविलेल्या वैचारिक जागर उपक्रमाचा थोडक्यात आढावा सादर केला. तसेच मागील ३ वर्षापासून सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी ते राजमाता माँ जिजाऊ यांची जयंती १२ जानेवारी या १० दिवसांच्या कालावधीत शालेय चतुरंग व्याख्यानमाला घेतली जात असल्याचे सांगितले. तसेच २०२६ या नववर्षापासून परभणी शहर वगळता सर्व तालुक्याच्या ठिकाणी ही व्याख्यानमाला होईल अशी माहिती दिली. याशिवाय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आणि चतुरंग कट्टा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दर तीन महिन्याला एका लोकप्रतिनिधीला चतुरंग कट्ट्यावर खुल्या चर्चेसाठी आमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande