
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)।गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने इळेगाव व गुंडेवाडीला जोडणार्या ओढ्यावर वनराई बंधार्याची उभारणी करण्यात आली. माती, वाळू, दगड व मुरूमच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या या बंधार्यामुळे दोन्ही गावांतील अनेक शेतकर्यांना मोठा लाभ होणार आहे.
गंगाखेड तालुक्यातील इळेगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेत सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरादरम्यान कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. अंगद गडमे, डॉ. कपिल लामतुरे, प्रा. विजयकुमार पवळे, डॉ. दीपाली पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थी स्वयंसेवक, ग्रामस्थ व शेतकर्यांच्या संयुक्त सहभागातून इळेगाव ते गुंडेवाडी मार्गावरील ओढ्यावर हा बंधारा उभारण्यात आला. सुमारे 70 ते 80 स्वयंसेवकांसह अनेक ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. या वनराई बंधार्यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन ते जमिनीत मुरविण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास हातभार लागणार असून बंधार्यालगतच्या शेतकर्यांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी व उन्हाळी हंगामात शेतकर्यांना पिके घेणे शक्य होणार आहे.
या बंधार्यासाठी शासनाची कोणतीही आर्थिक मदत न लागता स्वयंसेवक व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच बंधार्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी काही शेतकर्यांनी स्वीकारत ‘दत्तक बंधारा’ म्हणून त्याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis