
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त देण्यात येणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे (आवर्ती संपादक, देशोन्नती, नांदेड) यांना, तर विकास वार्ता दर्पण पुरस्कार बाबुराव चव्हाण (उपसंपादक, लोकमत, धाराशिव) यांना जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार शनिवार 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता जिंतूर शहरातील जुनी मुन्सबी, भाजी मंडी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असून, या कार्यक्रमास आयबीएन लोकमतचे संपादक विलास बडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, जांभेकर पगडी, पुष्पहार व शाल असे आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी जिंतूरकरांसाठी साहित्यिक मेजवानीचे आयोजन करण्यात येते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा विभागात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देणार्या व निर्भीड लिखाण करणार्या दोन पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. यापूर्वी हा पुरस्कार अभिमन्यू कांबळे, संतोष धारासूरकर, राजाभाऊ नगरकर, सुरज कदम, वसंत भट, सुरेश जम्पंनगीरे, मारोती जुंबडे, फकीरा देशमुख, बालाजी मारगुडे, नामदेव खेडकर, विकास राऊत यांना प्रदान करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis