
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कालावधीत सर्वच पक्षाच्या राजकीय पुढार्यांसह पदाधिकार्यांनी पडद्याआड सातत्याने साटेलोटे करीत महानगरपालिकेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, असा आरोप करीत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केला. महापालिकेंतर्गत या भ्रष्ट साखळीच्या विरोधात सर्वसामान्य मतदारांना एक सक्षम पर्याय म्हणून यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडी सर्व जागा लढविणार आहे, अशी माहिती दिली.
परभणी महानगरासमोर अनंत प्रश्न उभे आहेत. हे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर व जटील झाले आहेत. सर्वसामान्य नागरीक या समस्यांमुळे अक्षरशः होरपळून निघाले आहेत. सर्वच स्तरावरील नागरीकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून काडीचीही सुविधा आजपर्यंत मिळाली नाही, अशी खंत आमदार गुट्टे यांनी व्यक्त केली. संपूर्ण शहर बकाल झाले आहे, बहुतांशी रस्ते पूर्णतः उखडले आहेत. नाल्या नाहीत, ज्या नाल्या अस्तित्वात आहेत. त्या नाल्यांमधून सांडपाणी वाहत नाही, मोठ्या नाल्या लुप्त झाल्या आहेत, संपूर्ण शहरात कचर्यांचे ढीग साचले आहेत, दुर्गंधी सर्वदूर पसरली आहे, त्यामुळे डासांनी उच्छाद मांडला आहे, आरोग्याचे प्रश्न गंभीर झाले आहेत. त्यातच संपूर्ण शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांबरोबर हजारो व्यक्ती कायमस्वरुपी जायबंदी झाल्या आहेत. रस्त्या रस्त्यांवर खड्ड्यांव्यतिरिक्त धूळीचे साम्राज्य आहे. त्याहीपेक्षा कहर सामान्य माणसास दहा-दहा दिवस पाणी मिळत नाही. मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर महानगरपालिका पूर्णतः अपयशी ठरली आहे, असे आमदार डॉ. गुट्टे यांनी निदर्शनास आणून दिले.
स्थापनेपासून मनपाची स्थिती गंभीर आहे. सर्व आघाड्यांवर मनपा सपशेल फेल ठरली आहे. आर्थिकदृष्ट्या मनपाचा गाडा कोलमडलेला आहे. सहा-सहा महिने कर्मचार्यांनासुध्दा मनपा वेतन देऊ शकत नाही. वीजेचे बिलसुध्दा अदा करण्याएवढी महापालिकेची क्षमता नाही. त्यामुळे या मनपाद्वारे भविष्यात विकास कामे केली जातील, याची शाश्वतीसुध्दा नाही, आजपर्यंत या महापालिकेवर ज्यांनी ज्यांनी सत्ता गाजवली, त्या मातब्बरांसह पदाधिकार्यांनी भ्रष्ट कारभार करीत महापालिकेची लक्तरे वेशीवर टांगली. सत्तारुढ असो, विरोधी पक्षाने साटेलोटे करीत केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. गुत्तेदारी करीत मलिदा लाटला, कोट्यवधी रुपयांच्या योजना पध्दतशीरपणे हडप केल्या, पाणी पुरवठा योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे नमूद करीत गुट्टे यांनी सर्वसामान्य नागरीक या सार्या गोष्टींमुळे हतबल झाला आहे. या नागरीकांना चांगला आणि उत्तम पर्याय हवा आहे, त्यामुळेच आपण महापालिकेंतर्गत चांगल्या स्थानिक नेतेमंडळींसह स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवून मतदारांसमोर उत्तम पर्याय उभे करणार आहोत, त्यास निश्चितच सामान्य मतदार मोठा प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा गुट्टे यांनी व्यक्त केली.
यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, फारुक बाबा, आहान भाई, सुशील कांबळे, रवि कांबळे, डॉ. दिनेश कांबळे, के.के. भारसाखळे, साजेद बेलदार, हरुण भाई आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis