
पुणे, 16 डिसेंबर, (हिं.स.)। पिंपरी शहरातील जे नागरिक व प्राणीप्रेमी मोकाट श्वानांना नियमितपणे अन्न खाऊ घालतात, त्यांनी त्याबाबतचा अर्ज महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे सादर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.नागरिकांनी अर्ज सादर करताना त्या अर्जामध्ये श्वानांना अन्न खाऊ घालण्यात येणाऱ्या ठिकाणाची अचूक माहिती, अन्न देण्याची वेळ, त्या ठिकाणी असलेल्या मोकाट श्वानांची अंदाजे संख्या तसेच संबंधित अन्य आवश्यक तपशील नमूद करणे बंधनकारक असणार आहे.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ असून नागरिकांनी पशुवैद्यकीय विभागात प्रत्यक्षरित्या अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून श्वानांना अन्न खाऊ घालण्यासाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्यात येणार आहेत.अर्जाचा नमुना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु