
रायगड, 16 डिसेंबर, (हिं.स.)। मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर चालत्या मालवाहू ट्रकमधून अॅल्युमिनियमचा मौल्यवान माल चोरी करणाऱ्या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर मडाप बोगदा ते कुंभारली पुलादरम्यान मालवाहू ट्रक (क्र. MH-16-AY-6197) सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी ट्रकमध्ये चढून ३२ हजार रुपये किमतीचे ४५ अॅल्युमिनियम अलॉय इंगॉट्स चोरी केले. हा माल रस्त्यावर टाकून इको कारमधून उचलण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस वापरलेली MH-01-AT-2440 क्रमांकाची इको कार निष्पन्न झाली. गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून ११ डिसेंबर २०२५ रोजी वडाळा–डोंगरी, मुंबई परिसरातून अर्जुन शंकर काळे (वय ३२) व सोहेल रहिम खान (वय ४०) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचा माल भंगार व्यावसायिकाकडे विकल्याचे सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिजीत शिवठरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. विशाल नेहुळ आणि पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, मोहन विठ्ठल भालेराव, तसेच पोलीस हवालदार संतोष जाधव (८७३), शरद फरांदे (१५५५), शेखर मोरे (२३३०), अर्जुन मोरे (७१६), रुपेश खोत्रे (२१२१), निलेश कुमरे (१०७८) आणि शिवाजी बोडके (२२४६) यांचा समावेश होता.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके