
नाशिक, 16 डिसेंबर (हिं.स.)। - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि.१७ डिसेंबर २०२५ रोजी भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सकाळी १० ते ५ या वेळत नाशिक शहरातील प्रभाग १ ते ३१ साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महानगरपलिका निवडणुकींचा प्रोग्राम जाहीर केला आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत आपला झेंडा रोवण्यास सज्ज झाली आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीकडे इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाशिक शहर यांच्या वतीने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ ते ३१ मधील सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाशिक येथील भुजबळ फार्म येथे संपन्न होणार आहेत. या महत्त्वपूर्ण मुलाखतींना नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थिती असणार आहे.
पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आणि सक्षम, कार्यक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी या मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. यामध्ये प्रभागनिहाय स्थानिक प्रश्न, पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य, संघटनात्मक अनुभव तसेच आगामी निवडणुकीसाठीची तयारी या बाबींचा सखोल आढावा या मुलाखतीदरम्यान घेतला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी या मुलाखतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV