
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूण जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४ कोटी १८ लाखांहून अधिक रकमेची वसुली करण्यात आली.
विशेष म्हणजे गेल्या अडीच वर्षांत सलग १० राष्ट्रीय लोकअदालतींच्या माध्यमातून २१ कोटी रुपयांहून अधिक रकमेची उल्लेखनीय तडजोड व वसुली करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायालयातील व तालुका विधी सेवा समितीअंतर्गत एकूण ७३२ प्रलंबित प्रकरणे तसेच १ हजार ५३५ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ७३२ पैकी १३९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या दिवाणी व फौजदारी प्रकरणांतून ४ कोटी ४ लाख ३२ हजार ५२८ रुपयांची तडजोड करण्यात आली. वादपूर्व प्रकरणांपैकी २३३ प्रकरणे निकाली काढून १४ लाख २ हजार १०१ रुपयांची तडजोड व वसुली करण्यात आली.
या लोकअदालतीत विविध बँका, पतसंस्था, महावितरण कंपनी, इतर वित्तीय संस्था, नुकसानभरपाईचे अर्ज, कौटुंबिक हिंसाचार तसेच पोटगीसंबंधीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. या कामकाजासाठी न्यायाधीश व वकिलांची तीन पॅनेल कार्यरत होती.
लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, दिवाणी न्यायाधीश के. ए. पोवार, सहदिवाणी न्यायाधीश वाय. सी. पाटील तसेच पॅनल विधीज्ञ एन. एस. सावंत, एन. जी. लाड व श्रीमती एन. यू. पवार यांनी पाहिले.
या लोकअदालतीत पक्षकार व वकीलवर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून महत्त्वाची भूमिका बजावली. लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत झाली. या यशस्वी आयोजनासाठी चिपळूण वकील संघ, ज्येष्ठ विधीज्ञ, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी चिपळूण तालुका विधी सेवा समितीला सहकार्य केले.
लोकअदालतीच्या यशाबद्दल तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा डॉ. अनिता एस. नेवसे यांनी सर्व सहभागी घटकांचे आभार मानले. चिपळूण जिल्हा न्यायालयाने गेल्या अडीच वर्षांत सलग १० राष्ट्रीय लोकअदालतींच्या माध्यमातून केलेली ही २१ कोटींपेक्षा अधिक रकमेची वसुली न्यायप्रक्रियेत मैलाचा दगड ठरली आहे, असे मत व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी