
सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)।मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची लाच घेणाऱ्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार यांना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाल्याची माहिती मिळत आहे.चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे वय 52 असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या निवासी नायब तहसीलदार यांचे नाव आहे.
तक्रारदार मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी हेडगिरे यांनी 60 हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती 40 हजार रुपये ठरले ते घेताना सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले. हेडगिरे यांना ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात पुढील कार्यवाही सुरू आहे.विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला अशी जोरदार अफवा पसरली होती परंतु ती अफवाच निघाली. लगेच दोन दिवसांनी उत्तर तहसील कार्यालयातच ही कारवाई झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड