
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त केवळ धार्मिक विधी न करता समाजोपयोगी, मानवी सेवेतून तो साजरा करणे ही खरी श्रद्धांजली आहे, असे प्रतिपादन जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे यांनी केले. गरजू रुग्णांची हृदयरोग तपासणी करून आवश्यक असल्यास मोफत एन्जिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे ही समाजासाठी मोठी आणि प्रेरणादायी सेवा असल्याचेही त्यांनी म्हटले.
स्वर्गीय भोलारामजी कांकरिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त गंगाखेड येथील राजेश्वर फंक्शन हॉल येथे बीकेबीसी ट्रस्ट व आनंद ऋषी हॉस्पिटल,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश अर्बन बँकेचे चेअरमन घनश्याम मालपाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, अहिल्यानगर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. रविराज गवळी, डॉ. रविंद्र येळीकर, डॉ. तुषार नारे, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडचे अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली गीते आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबरातुन 150 हृदय रुग्णांची तर 170हून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. अवश्य त्या चिकित्सा करीता आनंदऋषिजी हॉस्पिटल अॅण्ड हार्ट सर्जरी सेंटर अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे
प्रास्ताविकात ट्रस्टच्या सचिव मंजुषा दर्डा यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून ट्रस्टच्या माध्यमातून विविध मानवी सेवाभावी उपक्रम राबवून स्मृतिदिन साजरा केला जातो. मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा संस्कार वडिलांकडून आणि आईकडून मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. आतापर्यंत ट्रस्टतर्फे 3,500 रुग्णांवर अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, नारायण ट्रस्टच्या सहकार्याने हजारो दिव्यांगांना साहित्य वाटप करण्यात आले आहे.माणुसकीची भिंत या उपक्रमातून गरजूंना भांडी, कपडे आदींची मदत केली जाते. तसेच भविष्यात ‘तेरे मेरे सपने’ या उपक्रमांतर्गत विवाहपूर्व मार्गदर्शनासाठी गंगाखेड येथे कार्यालय सुरू करण्याचा संकल्प यावेळी जाहीर करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis