
नवी दिल्ली , 16 डिसेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्डन दौरा पूर्ण करून मंगळवारी इथिओपियाची राजधानी अदीस अबाबा येथे पोहोचले आहेत. अदीस अबाबा विमानतळावर इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदी यांचे आलिंगन देत स्वागत केले. इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इथिओपियात आले आहेत. फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया या देशाला दिलेली ही पंतप्रधान मोदी यांची पहिलीच भेट आहे.
या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून, इथिओपियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. आपल्या भाषणात ते लोकशाहीची जननी म्हणून भारताने केलेल्या प्रवासावर आपले विचार मांडतील. तसेच भारत आणि इथिओपिया यांच्यातील भागीदारी ग्लोबल साउथसाठी किती महत्त्वाची ठरू शकते, यावरही पंतप्रधान मोदी आपली भूमिका मांडणार आहेत.
इथिओपियात राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच येथील भारतीय आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळाला. या दौऱ्यात भारत–इथिओपिया यांच्यात आरोग्य, शिक्षण तसेच ब्रिक्स सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इथिओपियानंतर आपल्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी ओमानला रवाना होणार आहेत.
यापूर्वी भारतातून रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दौऱ्याच्या महत्त्वावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, “मी प्रथमच फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपियाचा दौरा करत आहे. अदीस अबाबा येथे आफ्रिकन युनियनचे मुख्यालय आहे. 2023 मध्ये भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियनला G20चा स्थायी सदस्य बनवण्यात आले. अदीस अबाबामध्ये मी डॉ. अबी अहमद अली यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून तेथील भारतीय समुदायाशीही भेटण्याची संधी मिळेल.”
यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अलीकडील जॉर्डन दौऱ्याचाही आढावा घेतला. त्यांनी सांगितले की जॉर्डन दौऱ्याचे परिणाम महत्त्वपूर्ण असून त्यामुळे भारत–जॉर्डन संबंध अधिक मजबूत होतील. अक्षय ऊर्जा, डिजिटल नवोन्मेष आणि जलसंपदा व्यवस्थापनातील सहकार्याला त्यांनी सामायिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे वर्णन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode