
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.)।तीन दिवसीय अश्व हाताळणी व फॅरियरी प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाद्वारे आयोजन करण्यात आले आहे
परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात अश्व हाताळणी, अश्व पालन पद्धती तसेच नालबांधणी (फॅरियरी) या विषयांवरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 16) सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. 16 ते 18 डिसेंबर दरम्यान हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ब्रूक इंडिया आणि पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून ब्रूक इंडियाचे प्रशिक्षक डॉ. मुकेश पुरोहित तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापक प्रशिक्षणार्थींना सैद्धांतिक व प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. मंजुषा पाटील, डॉ. पंकज हासे, डॉ. शफी तोहीद तर सह-समन्वयक म्हणून डॉ. मुजीब, डॉ. कुमावत, डॉ. वानकर व डॉ. घोरपडे कार्यरत आहेत. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्राणेश येवतीकर यांनी अश्वांचे वर्तन समजून घेणे, करुणामय व सुरक्षित हाताळणी, योग्य पालन पद्धती तसेच शास्त्रशुद्ध नालबांधणीचे महत्त्व विशद केले. प्रशिक्षणादरम्यान अश्वांचे आजार, आरोग्य व्यवस्थापन, आहार नियोजन तसेच आधुनिक फॅरियरी तंत्रांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्व कल्याण व कार्यक्षम व्यवस्थापनासाठी असे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्या असून प्रात्यक्षिकासाठी घोड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्घाटन कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग, विषयतज्ज्ञ तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis