
परभणी, 16 डिसेंबर (हिं.स.) - परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील पेंडू बुद्रुक येथे धुळगुंडे यांच्या गढीच्या बाजूस एक शिलालेख आढळून आला असून तो जवळपास ८०० ते ९०० वर्ष जुना आहे. हा शिलालेख गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील अभ्यासू शिक्षक बळीराम पवार व विजयकुमार बाबर यांना आढळून आला. ते एका लग्नासाठी त्या गावात गेले होते. त्यानंतर त्यांची याची माहिती शिलालेख संशोधक कृष्णा गुडदे यांना दिली. गुडदे यांनी शिलालेखाचे छाप घेऊन वाचन करून महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा केला आहे. या दगडाला पूर्वी लोक ऊसन भरली की पाठ घासत असत. त्याने पाठीतील लचक कमी होते अशी गावकऱ्यांची धारणा होती.
शिलालेख शिळा ८८ सेमी उंच तर २६ ते ३० सेमी रुंद आहे. त्यापैकी वरील बाजूस ५२ सेमी वर लेख कोरला आहे. या शिलालेखाच्या वरील बाजूस शिल्प अथवा देवता कोरलेल्या नाहीत. शिलालेख देवनागरी लिपीत आहे. त्यात मराठी व संस्कृत भाषा आहे. ओळी १० आहेत. शिलालेखात तिथी किंवा राजवट विषयक मजकूर कोरलेला नाही. हा शिलालेख अक्षर वळण व भाषा यावरून १२ व्या शतकातील असावा, असे कृष्णा गुडदे यांनी सांगितले. शिलालेखाची सुरुवात 'स्वस्ति श्री' या मंगल वचनाने झाली आहे. येथील अमरेश्वर देवाच्या पूजेसाठी इलदेव याने जमीन दान दिली आहे. स्वतः दिलेले किंवा इतरांनी दिलेले दान जो कोणी हरण करेल तो या पृथ्वीवर साठ हजार वर्षांसाठी विष्ठेतील किड्याच्या जन्माला जाईल. असा शिलालेखाचा अर्थ आहे.
अमरेश्वर म्हणजे अमर असणारांचा देव किंवा अमरत्वाचा देव. हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि सामान्यतः भगवान शिवाचे उपनाम किंवा इतर नाव म्हणून वापरला जातो. विशेषतः जिथे भगवान शिवाला समर्पित मंदिरे आहेत, जसे की उज्जैनमधील अमरेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि आंध्र प्रदेशातील अमरावतीमधील अमरेश्वर मंदिर. अमर याचा अर्थ कधीही मरणारा नाही किंवा सर्वकाळ जगणारा असा होतो. ईश्वर याचा अर्थ भगवान किंवा स्वामी असा होतो. अमरेश्वर हा शब्द भगवान शिवासाठी एक उपाधी जातो, जो त्यांना देवांचा स्वामी आणि अविनाशी म्हणून दर्शवितो. शिवपुराणानुसार, अमरेश्वर ज्योतिर्लिंग हे उज्जैनमध्ये असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आंध्र प्रदेशातील अमरावती येथील अमरेश्वर स्वामी मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
थोडक्यात, अमरेश्वर म्हणजे अमर देवांचा स्वामी किंवा अमरत्वाचा स्वामी, जो भगवान शिवाची शक्ती आणि असीम स्वरूप प्रतिबिंबित करतो. या अमरेश्वर नावाची अनेक मंदिरे महाराष्ट्र व बाहेर ही पाहायला मिळतात. या अमरेश्वर देवतेचे मंदिर पूर्वी याच गावात असावे. नंतरच्या कालावधील ही शिळा स्थलांतरित झालेली दिसते. दाता इलदेव कोण आहे, कुठला आहे, कोणत्या पदावर आहे, तसेच त्याने नेमकी किती भूमी दान दिली, कुठे दिली? या सर्व प्रश्नांची उत्तरे अपूर्ण राहतात.
या संपूर्ण संशोधन कार्यासाठी शिलालेख शोधण्याचे काम करणारे शिवाजी पवार तसेच छाप घेताना मदत करणारे नारायण कदम, गावकरी बबन दिवटे, पंडित धुळगुंडे, दत्ता साखरे, दिगंबर पातळे, एकनाथ पातळे, गजानन श्रीरामे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. शिलालेख संशोधक कृष्णा गुडदे यांनी शिलालेखाचे वाचन केले आहे. त्यांना वाचनासाठी विक्रांत मंडपे यांची मदत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis