
पुणे, 16 डिसेंबर, (हिं.स.)पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याचे पिफ’चे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, विश्वस्त सतीश आळेकर, विश्वस्त सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) यावेळी उपस्थित होते.
पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर– युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय- लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा १० स्क्रीनमध्ये हा महोत्सव होणार आहे. महोत्सवासाठी सर्वांसाठी कॅटलॉग फी ८०० रुपये असून, ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. स्पॉट रजिस्ट्रेशन ५ जानेवारीपासून सर्व थिएटर्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ सुरू होणार आहे.चित्रपट महोत्सवाची यावेळची थीम ‘महान दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्म शताब्दी’, ही आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि ग्लोबल सिनेमा अशा विविध विभागांमध्ये सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत
चित्रपट महोत्सवाची सुरवात (ओपनिंग फिल्म) ‘ला ग्राझिया’ (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शीत चित्रपटाने होणार असून,महोत्सवाचा शेवट (क्लोजिंग फिल्म) ‘फादर मदर सिस्टर ब्रदर’ (अमेरिका,आर्यलंड,फ्रान्स) या जीम जारमुश दिग्दर्शीत चित्रपटाने होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधील ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपटास ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (१० लाख रुपये) दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु