परभणी - जीएसटीआर-3 बी कर विवरणपत्र भरण्यासाठी शनिवारपर्यंत विशेष मोहीम
परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य वस्तू व सेवाकर विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागांतर्गत आठही जिल्ह्यांमध्ये जीएसटीआर-3 बी कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी येत्या शनिवारपर्यंत (20 डिसेंबर) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती विभागाकडून
परभणी - जीएसटीआर-3 बी कर विवरणपत्र भरण्यासाठी शनिवारपर्यंत विशेष मोहीम


परभणी, 16 डिसेंबर, (हिं.स.)। राज्य वस्तू व सेवाकर विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागांतर्गत आठही जिल्ह्यांमध्ये जीएसटीआर-3 बी कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी येत्या शनिवारपर्यंत (20 डिसेंबर) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

वस्तू व सेवाकर कायद्यानुसार नोंदणीकृत करदात्यांनी दर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत मासिक जीएसटी 3 बी कर विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. काही करदात्यांची नोव्हेंबर 2025 पर्यंतची विवरणपत्रे प्रलंबित असल्याने विशेष मोहिमेअंतर्गत दि. 20 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व प्रलंबित विवरणपत्रे दाखल करण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले आहे.

जीएसटी 3 बी हे स्वयं-घोषित मासिक / तिमाही सारांश विवरणपत्र असून यामध्ये करदात्याचे करदायित्व, आरसीएम अंतर्गत दायित्व, उपलब्ध आवक कर वजावट यांची नोंद करणे आवश्यक आहे. या विवरणपत्राद्वारेच प्रत्यक्ष जीएसटी भरणा करण्यात येतो. जीएसटीआर 3 बी न भरल्यास जीएसटीएन प्रणालीद्वारे स्वयंचलित पद्धतीने दंड व व्याज आकारले जाते. तसेच शास्ती 50 हजार रुपयांपर्यंत आकारली जाऊ शकते, दोन किंवा अधिक विवरणपत्रे प्रलंबित असल्यास बँक खाते गोठवण्याची तरतूद, सहा विवरणपत्रे प्रलंबित असल्यास नोंदणी रद्द करण्याचे प्रावधान कायद्यात उपलब्ध आहे. त्यामुळे जीएसटीआर विवरणपत्र नियमितपणे दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर क्षेत्रातील जीएसटीआर-3 बी विवरणपत्र प्रलंबित आहे, असे सर्व जीएसटी नोंदणीकृत करदाते यांनी विशेष मोहीम कालावधीत तत्काळ विवरणपत्र दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे अपर आयुक्त (राज्य वस्तू व सेवाकर विभाग) अभिजित राऊत यांनी केले आहे, असे सहायक राज्यकर आयुक्त (प्रशा.) धनंजय देशमुख यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande